चीनच्या कोणत्याही कारवाईला चोख प्रत्युत्तर, जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 07:34 AM2023-02-08T07:34:50+5:302023-02-08T07:38:10+5:30
येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, वास्तविक नियंत्रण रेषेवर एकतर्फी स्थिती बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना अथवा अन्य कारवायांना निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल. आमचे सैन्य पूर्व लडाखमध्ये गस्त घालत आहे. तिथे तांत्रिक माध्यमांचादेखील उपयोग केला जात आहे.
श्रीनगर : लडाख सेक्टरमध्ये चीनच्या कोणत्याही आक्रमक कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहोत, असा इशारा लष्कराच्या उत्तरी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग- इन- चीफ लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे.
येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, वास्तविक नियंत्रण रेषेवर एकतर्फी स्थिती बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना अथवा अन्य कारवायांना निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल. आमचे सैन्य पूर्व लडाखमध्ये गस्त घालत आहे. तिथे तांत्रिक माध्यमांचादेखील उपयोग केला जात आहे.
उत्तर आणि पश्चिम सीमेवर शत्रूंकडून आव्हान आहे. या आव्हानांना आम्ही तोंड देत आहोत. भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सायबर आणि अंतराळ हे नवीन युद्धक्षेत्र म्हणून उदयास आले आहेत.
भारताला चिरडून टाकू : शाहबाज शरीफ
- ‘आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, त्यामुळे भारत आमच्यावर वाईट नजर टाकू शकत नाही आणि जर त्यांनी आमच्यावर वाईट नजर टाकली तर त्यांना आम्ही पायाखाली चिरडून टाकू,’ अशी पोकळ धमकी भिकेचे डोहाळे लागलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली.
- पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महागाई विक्रमी पातळीवर वाढत आहे. दहशतवादाने त्यांना खोलवर जखमा केल्या आहेत; पण या सगळ्यांतही पाकिस्तानचे पंतप्रधान भारताला आव्हान देण्यापासून मागे हटत नाहीत.
- पाकव्याप्त काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या शाहबाज शरीफ यांनी वरीलप्रमाणे पोकळ धमकी दिली. पाकिस्तानने भारताविरोधात असे वक्तव्य करून अणुबॉम्बची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही.