केंद्र सरकारचा मोठा धक्का; बरखास्तीच्या निर्णयानंतर ब्रिजभूषण समर्थक संजय सिंह यांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 02:05 PM2023-12-24T14:05:20+5:302023-12-24T14:10:13+5:30
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासारखाच असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याची अध्यक्षपदी निवड झाल्याने मी कुस्तीतून कायमची बाहेर पडत असल्याचं सांगत साक्षी मलिकने आपला संताप व्यक्त केला होता.
Sanjay Singh WFI : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज भारतीय कुस्ती महासंघावर नव्याने निवडून आलेल्या संजय सिंह आणि त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारणीला मोठा धक्का देत बरखास्तीचा निर्णय घेतला. क्रीडा मंत्रालयाचा हा निर्णय कुस्ती महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. कारण संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे अत्यंत खास म्हणून ओळखले जातात. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयानंतर संजय सिंह यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
"क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला तेव्हा मी विमानातच होतो. माझ्याकडे अद्याप निर्णयाबाबत सविस्तर माहिती नाही. त्यामुळे ही माहिती घेतल्यानंतरच याबाबत मी भाष्य करू शकेन," असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे. तसंच क्रीडा मंत्रालयाने माझ्या नेमणुकीला स्थगिती दिल्याची प्राथमिक माहिती आहे, असंही सिंह यांनी म्हटलं आहे.
क्रीडा मंत्रालयाने का घेतला कठोर निर्णय?
कुस्ती महासंघाची यंदाची निवडणूक वादात सापडली होती. कारण ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर कुस्तीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. गंभीर आरोप असलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासारखाच असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याचीच निवड झाल्याने मी कुस्तीतून कायमची बाहेर पडत असल्याचं सांगत साक्षी मलिकने आपला संताप व्यक्त केला होता. साक्षीच्या या भूमिकेची देशभरात चर्चा झाल्याने सरकारवरही दबाव निर्माण झाला होता. त्यातच कुस्ती महासंघाच्या निवनियुक्त अध्यक्षांनी पदभार स्वीकारताच एक वादग्रस्त निर्णय घेतला. ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप गोंडा येथे आयोजित करण्याचा निर्णय कुस्ती महासंघाकडून घेण्यात आला होता. मात्र कुस्ती महासंघाच्या संविधानातील तरतुदींचं पालन न करता हा निर्णय घेण्यात आल्याचं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे. या निर्णयातून अध्यक्षांची मनमानी दिसून येत असल्याचंही क्रीडा मंत्रालयाने म्हटलं असून संजय सिंह यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या या कठोर निर्णयाची देशभर चर्चा होत असून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लढा लढणाऱ्या कुस्तीपटूंनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.