विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच AAP ला मोठा धक्का, एकाच वेळी 7 आमदारांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:38 IST2025-01-31T18:38:09+5:302025-01-31T18:38:52+5:30
राजेश ऋषी, नरेश यादव, रोहित कुमार महरौलिया, आणि मदन लाल यांच्यासह एकूण 7 आमदारांनी शुक्रवारी राजीनाम्याची घोषणा केली...

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच AAP ला मोठा धक्का, एकाच वेळी 7 आमदारांचा राजीनामा
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. मतदानाच्या पाच दिवस आधीच आपच्या 7 आमदारांनी राजीनामा दिला आहे. पक्षाने या सातही आमदारांचे तिकीट कापले होते. यामुळे हे आमदार नाराज होते. राजेश ऋषी, नरेश यादव, रोहित कुमार महरौलिया, आणि मदन लाल यांच्यासह एकूण 7 आमदारांनी शुक्रवारी राजीनाम्याची घोषणा केली.
जनकपुरीचे दोन वेळचे आमदार राजेश ऋषी -
जनकपुरी येथून दोन वेळा आमदार राहिलेले राजेश ऋषी यांनी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या राजेश ऋषी यांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात, "पक्ष आपले मूलभूत सिद्धांत सोडून भ्रष्टाचारात बुडाला आहे. संतोष कोळी यांच्या खुन्याला तिकीट देण्यात आले, हा पक्ष कार्यकर्त्यांचा विश्वासघात आहे," असा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर "आम आदमी पक्ष एका अनियंत्रित टोळीसाठी स्वर्ग बनला आहे. पक्षाचे नेतृत्व हे भ्रष्टाचार, घराणेशाही आणि हुकूमशाहीचा समानार्थी शब्द बनला आहे," असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
महरौलीचे आमदार नरेश यादव -
मेहरौलीचे आमदार नरेश यादव यांनीही पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करत राजीनामा दिला आहे. नरेश यादव यांना पक्षाने तिकीट दिले होते, परंतु नंतर ते मागे घेण्यात आले. नरेश यादव यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, "भारतीय राजकारणाला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी भ्रष्टाचाराविरुद्धच्या अण्णांच्या आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला. मात्र आता मला अत्यंत दुःख होत आहे की, आम आदमी पक्ष भ्रष्टाचार अजिबात कमी करू शकला नाही, उलट आम आदमी पक्ष स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे."
त्रिलोकपुरीचे आमदार रोहित कुमार -
त्रिलोकपुरी येथील आम आदमी पक्षाचे आमदार तथा दलित नेते रोहित कुमार मेहरौलिया यांनीही राजीनामा दिला आहे. यावेळी पक्षाने त्यांचेही तिकीट कापले होते. ते अण्णा आंदोलनापासून आदमी पक्षात होते. रोहित यांनी 'X'वर आपल्या राजीनाम्याची प्रत शेअर केली आहे. यात, "ज्यांना बाबासाहेबांचा केवळ फोटो हवा आहे, त्यांचे विचार नकोत! आजपासून, अशा संधीसाधू लोकांसोबतचे माझे नाते संपले. मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे."
पालमच्या आमदार भावना गौड -
पालम मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार भावना गौर यांनीही राजीनामा दिला आहे. यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यांनी पाच ओळींचा राजीनामा पाठवला यात, आता आपल्याला अरविंद केजरीवाल आणि पक्षावर विश्वास राहिलेला नाही, असे म्हणण्यात आले आहे. याशिवाय, कस्तूरबा नगरचे आमदार मदन लाल, बिजवासनचे आमदार भूपेंद्र सिंह जून आणि आदर्श नगरचे आमदार पवन शर्मा यांनीही पक्षावर आणि रक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.