विरोधी ऐक्याला मोठा धक्का, भाजपाविरोधातील राष्ट्रव्यापी आघाडीत सहभागी होण्यास शिवसेनेच्या मित्रपक्षाने दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:01 AM2022-04-28T11:01:42+5:302022-04-28T11:14:50+5:30
K Chandrashekar Rao News: तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या एका विधानामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
हैदराबाद - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एक राष्ट्रव्यापी आघाडी तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभे करण्याची तयारी विरोधी पक्षांकडून सुरू आहे. मात्र तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या एका विधानामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राव यांनी बुधवारी सांगितले की, ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गैर-काँग्रेस आणि गैर-भाजपा पक्षांची राजकीय आघाडी तयार करण्याच्या बाजूने नाही आहेत. सध्या देशाला अशा आघाडीऐवजी टीआरएसप्रमाणे एका पर्यायी अजेंड्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर राव यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
पक्षाच्या २१व्या स्थापना दिवशी झालेल्या बैठकीला संबोधित करताना के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले की, डाव्या पक्षांनी हल्लीच माझी भेट घेऊन केंद्रातून भाजपाला हटवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, सांगितले की, पंतप्रधानांना हटवण्याचा विषय चुकीचा होता. शेवटी लोकशाहीचा विजय झाला पाहिजे.
उल्लेखनीय बाब म्हणजे चंद्रशेखर राव यांनी केलेलं हे विधान त्यांच्या भाजपाविरोधातील आधीच्या विधानांपेक्षा एकदम विरुद्ध आहे. त्यांनी ११ एप्रिल रोजी दिल्लीमध्ये आंदोलन केले होते. त्यात मोदींना उद्देशून म्हटले होते की, त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये, अन्यथा जनता त्यांचे सरकार पाडेल. मात्र बुधवारच्या आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की, टीआरएस एक प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडे टीआरएसला राष्ट्रीय पक्षामध्ये बदलण्याचाही सल्ला आला होता. तसेच टीआरएसचं नाव बदलून भारतीय राष्ट्र समिती करण्याचाही सल्ला मिळाला होता.
दरम्यान, केसीआर यांनी सांगितले की, जर हैदराबादमधून देशाची दिशी बदलणार असेल तर ती तेलंगाणाच्या जनतेसाठी अभिमानाची बाब असेल. टीआरएस पर्यायी अजेंडा तयार करण्यासाठी आणि देशाला नवी दिशा देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान, पर्यायी शक्ती लवकरच समोर येईल आणि एक राजकीय वादळ निर्माण करील, असा विश्वासही केसीआर यांनी व्यक्त केला.