सूरतच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार चार दिवस झाले तरी बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 03:21 PM2024-04-24T15:21:41+5:302024-04-24T15:22:15+5:30
BJP Won Surat Loksabha Seat, Suspicious: इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला तर अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचा उमेदवार जिंकला आहे. परंतु यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आपला आला आहे. प्रकरण वाढल्याचे दिसताच निवडणूक आयोग कार्यरत.
गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात बिनविरोध लढत झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला तर अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचा उमेदवार जिंकला आहे. परंतु यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आपला आला आहे. काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असून तो सापडत नसल्याने या बिनविरोध प्रकरणाविरोधात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुंभाणी यांचा अर्ज रद्द झाल्याने काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सावरू शकलेले नाहीत. तर आपने कुंभाणी यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. आपने सुरतच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुरतचे जिल्हाधिकारी सौरभ पारघी यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाने वातावरण तापविताच मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती यांनी याचा अहवाल मागविला आहे. यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
निलेश कुंभाणी यांच्याविरोधात जिल्हाधिकारी अहवाल देणार आहेत. यानंतर सुमोटो लावायचा की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहून सु मोटो देखील घेतला जाऊ शकतो. अनेक प्रकरणांत आम्ही अशी कारवाई केली आहे, असे भारती यांनी म्हटले.
या प्रकरणावर आता पोलीस अधिकारी शमशेर सिंग यांचे वक्तव्य आले आहे. ज्यांनी सुरक्षा मागितली त्यांना दिली. बसपाच्या उमेदवारानेही मागितली होती. परंतु ते घरी सापडले नाहीत. पोलिसांवर लावले जात असलेले आरोप चुकीचे आहेत. क्राइम ब्रांच कुठेही गेलेली नाही. आमच्याकडे तक्रार आल्यावर त्यावर कारवाई करणार, असे ते म्हणाले आहेत.
कुंभाणी काही पहिल्यांदाच निवडणूक लढवत नव्हते. यापूर्वी त्यांनी चार वेळा निवडणूक लढविली आहे. यामध्ये महापालिका, विधानसभा अशा या निवडणुका आहेत. तिकीट मिळाल्यावर कुंभाणी यांनी सर्व ताकदीने प्रचार सुरु केला होता. कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जावर एका प्रस्तावका सही चुकीची असल्याची तक्रार भाजपाने केली होती. यावरून या प्रस्तावकांना बोलविण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु ते बेपत्ता होते. यानंतर कुंभाणी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. आता ते देखील बेपत्ता झाले असून त्यांच्या घरी कुलुप लावलेले आहे. तर गद्दार असे पोस्टर चिकटविण्यात आले आहे.