नवीन पटनाईक यांना झटका, भाजपने हिसकाविली विक्रमाची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 07:59 AM2024-06-05T07:59:36+5:302024-06-05T08:00:00+5:30
भाजपने बहुमताकडे मिळविल्यामुळे नवीन पटनाईक यांना सत्तास्थापनेचा विक्रम करता आला नाही.
भुवनेश्वर : ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली असून सत्ताधारी बीजेडीला पराभवाचा झटका दिला आहे. राज्यातील १४७ विधानसभा जागांपैकी ३३ जागांवर विजय मिळवला, तर ४५ जागांवर आघाडी घेतली असून एकूण ७८ जागांच्या आघाडीसह सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. दुसरीकडे बिजू जनता दलाने २५ जागांवर विजय मिळवला असून २६ मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेसने ५ जागा जिंकल्या, तर ९ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने बहुमताकडे मिळविल्यामुळे नवीन पटनाईक यांना सत्तास्थापनेचा विक्रम करता आला नाही.
मुख्यमंत्री पटनायक पिछाडीवर
मुख्यमंत्री आणि बीजेडीचे सुप्रीमो नवीन पटनायक यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली. ते बोलंगीर जिल्ह्यातील कांताबंजी विधानसभा जागेवर भाजपच्या लक्ष्मण बग यांच्यापेक्षा १२,१६४ मतांनी पिछाडीवर होते, परंतु गंजम जिल्ह्यातील हिंजिली जागेवर त्यांचे भाजप प्रतिस्पर्धी शिशीर कुमार मिश्रा यांच्यापेक्षा ४,५९१ मतांनी ते आघाडीवर होते.
आठ मंत्री पिछाडीवर
ओडिशा विधानसभा निवडणुकीत नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळातील किमान आठ मंत्री पिछाडीवर आहेत. वन आणि पर्यावरण मंत्री प्रदीप कुमार आमत, बांधकाम मंत्री प्रफुल्ल कुमार मल्लिक, उच्च शिक्षण मंत्री अतनु सब्यसाची नायक, परिवहन मंत्री तुकुनी साहू, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अशोक चंद्र पांडा, वित्त मंत्री बिक्रम केशरी अरुखा, हातमाग आणि वस्त्रोद्योग मंत्री रिता साहू आणि महिला आणि बाल विकास मंत्री बसंती हेमब्रम पिछाडीवर आहेत.
आंध्रात एनडीएची विजयी घोडदौड
अमरावती : तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) आणि त्याचे भागीदार जनसेना, भाजप युतीने आंध्र प्रदेशमध्ये मुसंडी मारली आहे. युतीने १६५ विधानसभा जागांवर आघाडी मिळवली असून, ७० विधानसभा मतदारसंघांत विजय मिळवला आहे. राज्यातून सत्ताधारी वायएसआरसीपीचा दणदणीत पराभव झाला आहे.
टीडीपीने ५७, जनसेनेने ९, भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत, तर वायएसआरसीपीने ३ जागांवर विजय मिळविला असून एकूण १० जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, एक मंत्री वगळता मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य पिछाडीवर आहेत. राज्यातील सत्ताधारी वायएसआरसीपीला आव्हान देण्यासाठी टीडीपी, भाजप आणि जनसेना यांनी एनडीए युतीची स्थापना केली होती.