शेकोटी पेटवली अन् ६ जणांचा श्वास थांबला, दिल्लीतील मृतांत एकाच कुटुंबातील चौघे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 07:20 AM2024-01-15T07:20:04+5:302024-01-15T07:20:12+5:30
दिल्लीतील पारा ३.५ अंशांपर्यंत घसरला. धुक्यामुळे रेल्वे, विमानसेवेवरही परिणाम झाला आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तरेतील पाच राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप चांगलाच वाढला आहे. थंडीपासून वाचण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीच्या धुरामुळे गुदमरून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दिल्लीत सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. दिल्लीतील पारा ३.५ अंशांपर्यंत घसरला. धुक्यामुळे रेल्वे, विमानसेवेवरही परिणाम झाला आहे.
दिल्लीच्या अलीपूर परिसरातील एका घरातील चार व्यक्ती अत्यवस्थ असल्याची माहिती पोलिसांना समजले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळाची पाहणी केली असता घरात शेकोटी पेटविल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धुरामुळे गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. राकेश (वय ४०), पत्नी (ललिता (३८), पीयूष (८) व सनी (७) अशी मृतांचे नाव आहे. अशीच घटना पश्चिम दिल्लीच्या इंद्रपुरी भागात घडली. तिथेही शेकोटीच्या धुरामुळे गुदमरून दोन नेपाळी व्यक्तींचा मृत्यू झाला. रामबहादूर (५७) व अभिषेक (२२) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान श्रीनगरमध्ये पारा उणे ४.२ वर
गेला आहे.