५ किलो बटाट्याची मागितली लाच, तीन किलोवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 12:19 PM2024-08-11T12:19:28+5:302024-08-11T13:04:28+5:30
Police demands 5 kg potatoes as bribe : पोलीस कर्मचाऱ्यानं प्रकरण मिटवण्यासाठी लाच म्हणून ५ किलो बटाटे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
Police demands 5 kg potatoes as bribe : लखनौ : उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात लाच मागण्याचा एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्यानं प्रकरण मिटवण्यासाठी लाच म्हणून ५ किलो बटाटे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी आणि तक्रारदार यांच्यात एका कामासाठी बटाट्यांची लाच देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
कन्नौज जिल्ह्यातील सौरिख पोलीस ठाणे क्षेत्रातील चपुन्ना पोलीस ठाण्याचे प्रभारी रामकृपाल सिंह आणि तक्रारदारांचा ऑडिओ व्हायरल झाला होता. ज्यात लाच म्हणून बटाटे मागण्यात आले होते. संबंधित ऑडियो क्लिपमध्ये पोलीस ठाण्याच्या प्रभारीने प्रकरण मिटवण्यासाठी लाचेच्या रुपात ५ किलो बटाटे मागितले. मात्र, समोरचा व्यक्ती बटाटे देण्यास असमर्थता दाखवत आहे. त्याने केवळ २ किलो बटाटे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, शेवटी दोघांचे ३ किलो बटाट्यांवर एकमत झाले.
हा ऑडियो व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारीही थक्क झाले आहेत. पोलीस अधीक्षकांनी ठाणे प्रभारीला निलंबित करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व्हायरल ऑडियोची पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी दखल घेतली आहे. त्यांनी चौकी प्रभारीला तत्काळ निलंबित केले. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बटाटे शब्दाचा वापर केवळ भ्रष्टाचाराचा कोड रुपात केला आहे. त्यांनी म्हटले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे व आरोपी पोलीस निरीक्षकाविरोधात विभागीय चौकशी केली जात आहे.
आलू कहे आज का, नहीं चाहिए भाजपा - अखिलेश यादव
दुसरीकडे, याप्रकरणावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "भाजपच्या राजवटीत 'बटाटा' हा लाच घेण्यासाठी कोड वर्ड बनला आहे. तसं, भाजपच्या राजवटीत भाजीपाला एवढा महागला आहे की, उद्या प्रत्यक्षात भाजीच्या स्वरूपात लाच मागितली जाईल. आता भाजप विचार करत आहे की, आपल्या इन्स्पेक्टरला वाचवण्यासाठी बटाट्यांवर बुलडोझर का चालवू नये. आलू कहे आज का, नहीं चाहिए भाजपा."