नरेंद्र मोदींच्या जवळचे नोकरशहा उत्तर प्रदेशात बनणार मंत्री; योगी आज पंतप्रधानांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 08:06 AM2022-03-13T08:06:19+5:302022-03-13T08:33:59+5:30
१५, १६ किंवा २१ मार्च रोजी योगी सरकारचा शपथविधी होऊ शकतो.
- राजेंद्र कुमार
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विचारविनिमय पूर्ण झाला आहे. यावेळी त्यांच्या सरकारमध्ये बेबी राणी मौर्य, पंकज सिंह, राजेश्वर सिंह, असीम अरुण व अरविंद कुमार शर्मा यांच्यासह दोन सहयोगी पक्षांच्या चार जणांना मंत्री केले जाणार आहे.
रविवारी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री व यूपीचे प्रभारी अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. दलित समाजाचा सहभाग वाढविणे व जातीय तसेच प्रादेशिक संतुलन ठेवण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यानुसार ते आग्रा ग्रामीणच्या आमदार बेबीराणी मौर्य यांना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्त आयएएस व एमएलसी अरविंद कुमार शर्मा, सेवानिवृत्त आयपीएस असीम अरुण व अंमलबजावणी संचालनालयाचे माजी संयुक्त संचालक आ. राजेश्वर सिंह यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याबाबत ते आग्रही आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह आहेत. यानाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.
शपथविधीसाठी तीन तारखा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले की, योगींच्या शपथविधी समारंभात पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, भाजप राष्ट्रीय अध्यक्षांसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. १५, १६ किंवा २१ मार्च रोजी योगी सरकारचा शपथविधी होऊ शकतो.