ऐकावं ते नवलच! एक वर्षाच्या चिमुकल्याने सापाला चावून ठार केलं; खेळता खेळता घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 08:01 PM2024-08-20T20:01:56+5:302024-08-20T20:14:02+5:30
एक वर्षाच्या मुलाने सापाला खेळणे समजून त्याच्याशी खेळायला सुरुवात केली अन् त्याचा जीव घेतला.
सोशल मीडियाच्या या जगात अनोख्या घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत असतात. अशीच एक अनोखी घटना समोर आली आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातील धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. इथे एक वर्षाच्या मुलाने सापाला खेळणे समजून त्याच्याशी खेळायला सुरुवात केली अन् त्याचा जीव घेतला. खेळता खेळता त्याने सापाला चावा घेतला आणि त्याला चावून मारले. त्यानंतर जेव्हा आईची नजर मुलावर पडली, तेव्हा ते पाहून ती देखील खूप घाबरली. भीतीपोटी संबंधित माऊली आपल्या मुलाला घेऊन इस्पितळात गेली.
दरम्यान, मुलाने ज्या सापाला चावा घेतला तो साप विषारी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळेच सुदैवाने चिमुकल्याचे प्राण वाचले. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. डॉक्टरांनी हे सांगताच आईचा जीव जीवात आला. खरे तर सापाचा चावा घेतल्याने संबंधित चिमुकल्याचे दात दुखत आहेत. मात्र, एक वर्षाच्या मुलाने खेळताना सापाचा जीव कसा घेतला यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मुलाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, चिमुकला अंगणात खेळत होता. ती देखील तिथेच होती. पण, अचानक तिची आपल्या मुलावर नजर पडली अन् ती अवाक् झाली. मुलाच्या हातात साप पाहून ती घाबरली. आपल्या मुलाने तोंडात साप धरला आहे यावर काही क्षण तिचा विश्वासच बसला नाही. मग तिने मुलाच्या तोंडातून साप काढला आणि फेकून दिला. साप मेला होता हे पाहून तिने मोकळा श्वास घेतला पण तिला साप मेला कसा याचीही चिंता सतावत होती. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. एक वर्षाच्या मुलाचा कारनामा ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यानंतर मृत सापाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली.