संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 08:36 AM2024-10-16T08:36:04+5:302024-10-16T08:38:23+5:30
या प्रकरणात महिलेने एका व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून सुरू असलेला खटला उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. विवाहाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला होता.
अलाहाबाद : फसवणुकीच्या कोणत्याही शक्यता नसलेल्या व्यवहारातून दीर्घकाळ पारंपरिक संमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरू शकत नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणात महिलेने एका व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून सुरू असलेला खटला उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. विवाहाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला होता. जोवर एखाद्या पुरुषाने प्रारंभीपासूनच महिलेस विवाहाचे अभिवचन दिले होते हे सिद्ध होत नाही, तोवर असे संबंध बलात्काराच्या श्रेणीत येत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीने विवाहाचे वचन दिलेले असताना त्यात फसवणूक होत असल्याचे पुरावे जोवर उपलब्ध होत नाहीत तोवर दोष सिद्ध होऊ शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी एका पुरुषाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
प्रत्येक वचन खोटे मानता येणार नाही
- एका महिलेने श्रेय गुप्ता नामक व्यक्तीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती.
- ९ ऑगस्ट २०१८ रोजी कनिष्ठ न्यायालयाने याची दखल घेतली तेव्हा आरोपीने आरोपपत्राविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली.
- सर्व तथ्यांची पडताळणी करून उच्च न्यायालयाने नमूद केले की, विवाहाचे प्रत्येक वचन खोटे मानून तो बलात्काराचा गुन्हा ठरवत एखाद्या व्यक्तीविरुद्ध खटला चालवणे याेग्य ठरणार नाही.
न्यायालयाने केला या मुद्द्यांचा विचार
- पतीच्या मृत्यूनंतर हे संबंध प्रस्थापित झाल्याचा महिलेचा होता दावा.
- मात्र या महिलेचा पती जिवंत असतानाही हे संबंध सुरूच होते.
- ही महिला व आरोपीदरम्यान सुमारे १२-१३ वर्षे शरीरसंबंध राहिले.
- आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या पुरुषासोबत महिलेने हे संबंध ठेवले होते.