वंदे भारत ट्रेनला गाय धडकली, 30 मीटर दूर उभ्या असलेल्या वृद्धावर जाऊन कोसळली; दोघांचाही जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:07 AM2023-04-20T00:07:44+5:302023-04-20T00:10:41+5:30
ट्रेनच्या धडकेनंतर गाय जवळपास 30 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका वृद्धावर जाऊन कोसळली. यात संबंधित वृद्धासह गायीचाही जागीच मृत्यू झाला.
वंदे भारत एक्सप्रेस, या सेमी हायस्पीड ट्रेनला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. राजस्थानातील अलवर शहरातील काली मोरी गेटजवळ दिल्लीहून अजमेरकडे जात असलेल्या या ट्रेनसमोर अचानकपणे एक गाय आल्याने हा अपघात झाला. ट्रेनच्या धडकेनंतर गाय जवळपास 30 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका वृद्धावर जाऊन कोसळली. यात संबंधित वृद्धासह गायीचाही जागीच मृत्यू झाला.
या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव शिवदयाल शर्मा (83) असे आहे. ते हिरा बास येथील रहिवासी आहेत. यावेळी तेथे आणखी एक व्यक्तीही उभी होती. पण सुदैवाने तिचा जीव वाचला. यासंदर्भात जीआरपी पोलिसांनी माहिती दिली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदयाल शर्मा रात्रीच्या वेळी टॉयलेटसाठी बाहेर गेले होते. या दरम्यान वेगात असलेल्या ट्रेनला गाय धडकली. याधडकेने गाय दूरवर फेकली गेली. यावेळी गायीखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी बुधवार सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांकडे दिला आहे.
23 वर्षांपूर्वी रेल्वेच्या सेवेतूनच झाले होते निवृत्त -
शिवदयाल शर्मा हे रेल्वे खात्यात इलेक्ट्रिशन म्हणून कार्यरत होते. जवळपास 23 वर्षांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांना दोन मुळे असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे.