जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; CRPF च्या अधिकाऱ्याला वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 17:50 IST2024-08-19T17:46:21+5:302024-08-19T17:50:08+5:30
मागील काही दिवसांपासून दहशतावादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; CRPF च्या अधिकाऱ्याला वीरमरण
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तणावाचे वातावरण अद्याप कायम आहे. मागील काही दिवसांपासून दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू आहे. आज जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अधिकाऱ्याला वीरमरण आले. दुडू भागात सीआरपीएफचे जवान नियमित गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा दलातील जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.
एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या एसओजीच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे एक अधिकारी शहीद झाले. तेथील संपूर्ण परिसरात दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. उधमपूरच्या दुडू भागात आधीच घुसलेल्या दहशतवाद्यांनी CRPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या (SOG संयुक्त दलावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफ अधिकारी गोळ्यांनी जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.
दुपारी ३.३० च्या सुमारास हा हल्ला झाल्याचे कळते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यात सीआरपीएफच्या १८७ व्या बटालियनच्या एका निरीक्षकाला गोळी लागली आणि नंतर रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अतिरिक्त फौजा घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.