एक दिवस आधीच राहुल गांधींचे स्वागत केलेले, अशोक गेहलोत यांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:04 PM2023-04-04T17:04:11+5:302023-04-04T17:05:22+5:30
राहुल गांधी सुरतला दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात आव्हान देण्यासाठी गेलेले असताना गेहलोत यांनीच त्यांचे स्वागत केले होते. या ठिकाणी देशभरातून काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना कोरोना झाल्याची बातमी येत नाही तोच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राहुल गांधी आणि अन्य मंत्री, पदाधिकारी देखील टेन्शनमध्ये आले आहेत.
राहुल गांधी सुरतला दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात आव्हान देण्यासाठी गेलेले असताना गेहलोत यांनीच त्यांचे स्वागत केले होते. या ठिकाणी देशभरातून काँग्रेसचे नेते उपस्थित होते. गेहलोत यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. मला कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस मी निवासस्थानातूनच काम पाहणार आहे. सर्वांनी काळजी घ्यावी आणि कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे.
गेहलोत यांना कोरोना झाल्याचे समजण्यापूर्वी भाजपाच्या नेत्या वसुंधरा राजे यांनी कोरोना झाल्याचे कळविले होते. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मी पूर्णपणे आयसोलेशनमध्ये आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी देखील कोरोनाची चाचणी करून घ्यावी. वसुंधरा यांनी गेल्या दोन दिवसांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा केली आहे. यामुळे भाजपाच्या गोटातही खळबळ उडाली आहे.
देशात कोरोना पुन्हा परतू लागला आहे. दररोज तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. दिल्ली एवनसीआरमध्ये दिवसाला ५०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. हरियाणाने १०० हून अधिक लोकसंख्या असलेल्या भागात मास्क सक्ती केली आहे. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात देखील सरकारी कार्यालये, कॉलेज आणि बँकांत मास्क सक्ती करण्यात आली आहे. तिकडे तामिळनाडू सरकारनेही मास्कसक्ती केली आहे.