"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 07:57 PM2024-09-19T19:57:30+5:302024-09-19T20:07:52+5:30
महिला ग्राहकाच्या व्यापाला कंटाळून संबंधित विद्यार्थ्याने जीवन संपवले.
सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट फार काळ लपून राहू शकत नाही. नेहमी हास्यास्पद तितक्यात संतापजनक घटना समोर येत असतात. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून अशीच एक अनोखी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि एकच खळबळ माजली. एका महिला ग्राहकाने केलेली शिवीगाळ आणि अपमान सहन न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.
संबंधित मृत तरुण बी.कॉमचे शिक्षण घेत घरखर्च भागवण्यासाठी नोकरी करायचा. ११ सप्टेंबर रोजी सामान डिलिव्हरी करण्यासाठी तो महिला ग्राहकाच्या घरी पोहोचला. पण, काही कारणास्तव त्याला घरी पोहोचण्यासाठी उशीर झाला. मग महिला ग्राहकाने पवित्रन या तरुणाशी वाद घातला आणि त्याला वाईट शब्द वापरले. याशिवाय डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून त्याची तक्रार देखील केली. मग १३ सप्टेंबर रोजी डिलिव्हरी बॉय पवित्रन याने दगडफेक करून ग्राहकाच्या घराच्या खिडकीची काच फोडली तेव्हा प्रकरण आणखी वाढले. या घटनेनंतर तक्रारदार ग्राहकाने पोलिसात तक्रार दाखल केली. मग याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली.
...अन् संपवले जीवन
दरम्यान, ही घटना ताजी असताना पवित्रनने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय पवित्रनने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली. त्यामध्ये त्याने म्हटले की, ग्राहकाच्या व्यापाला कंटाळून मी त्रस्त झालो होतो. हेच माझ्या आत्महत्येचे कारण आहे. जोपर्यंत अशा महिला असतील तोपर्यंत असेच मृत्यू होत राहतील.