बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:28 PM2024-12-02T17:28:39+5:302024-12-02T17:34:29+5:30
Hindus in Bangladesh: बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात शिवसेना ठाकरे गटालाही केवळ २० जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपाने केलेल्या आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचाराचा ठाकरे गटाला फटका बसल्याचे सांगण्यात येत होते. तसेच हिंदुत्वाबाबत घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळेही ठाकरे गटाचं नुकसान झाल्याचा दावा केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या दिशेने वळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
बांगलादेशमधील हिंदूंच्या प्रश्नावरून ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रियंका चतुर्वेदी लिहितात की, ऑगस्ट महिन्यापासून बांगलादेशमधीलहिंदूंवर हल्ले होत आहेत. त्यांची मंदिरं, घरं आणि उद्योग आस्थापनांना लक्ष्य केलं जात आहे. याबाबत भारत सककारने चिंता व्यक्त केल्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. वैष्णव नेते आणि इस्कॉनचे सदस्य चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात डांबण्यात आलं आहे. त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. तीन हिंदू मंदिरांवर हल्ला झाला आहे. तसेच इस्कॉनवर बंदी घालण्याचेही प्रयत्न झाले आहेत. या सर्व प्रकारांमुळे हिंदू आणि अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावणर आहे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रात लिहिले.
बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात भारत सरकारनं तातडीने पावलं उचलून तेथील काळजीवाहू सरकारशी संपर्क साधावा, अशी मागणीही प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्या लिहितात की, बांगलादेशमध्ये सुरू असलेला धार्मिक तणाव पाहता भारताने तातडीने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच तुम्हीही याबाबत बांगलादेशचे काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करून हिंदूंना लक्ष्य करून होत असलेल्या हिंसाचाराबाबत त्यांना जाब विचारावा, अशी माझी विनंती आहे. त्याबरोबरच बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंच्या जीवित आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठीही आपण संभाव्य मदत आणि बचाव उपाययोजनांबाबत विचार केला पाहिजे, असे आवाहनही प्रियंका चतुर्वेदी यांनी या पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.