शिस्तप्रिय अन् नाणावलेले वकील झाले १४वे उपराष्ट्रपती; जगदीप धनखड यांचा संघर्षमय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:30 AM2022-08-07T07:30:54+5:302022-08-07T07:31:11+5:30

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड विजयी झाले.

A disciplined and renowned lawyer became the 14th Vice President; Struggling journey of Jagdeep Dhankhad | शिस्तप्रिय अन् नाणावलेले वकील झाले १४वे उपराष्ट्रपती; जगदीप धनखड यांचा संघर्षमय प्रवास

शिस्तप्रिय अन् नाणावलेले वकील झाले १४वे उपराष्ट्रपती; जगदीप धनखड यांचा संघर्षमय प्रवास

Next

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड विजयी झाले. ते शालेय जीवनापासून अतिशय हुशार हाेते. इंग्रजी आणि संस्कृत या भाषांव्यतिरिक्त त्यांचे गणितावरही प्रभुत्व हाेते. शालेय जीवनापासून ते अतिशय शिस्तप्रिय हाेते. जगदीप धनखड यांच्या रोजच्या न्याहारीमध्ये अगदी साधे पदार्थ असतात. त्यांची दिनचर्याही ठरलेली आहे. ते रोज पहाटे पाच वाजता उठतात. त्यानंतर योगासने व देवाची पूजा करतात. त्यांच्या दुपारच्या जेवणात चपाती व भाजीचा समावेश असतो. रात्रीच्या जेवणात ते दाल-खिचडी खाणे पसंत करतात. तसेच त्यांना शेतीतही रुची आहे.

शिक्षण : भाजपचे ज्येष्ठ नेते व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांचा जन्म झुंझुनू जिल्ह्यातील किठाना या गावामध्ये १८ मे १९५१ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. चित्तोडगड येथील सैनिकी शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्र या विषयात पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर राजस्थान विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळविली. 

वकिलीतील करिअर : जगदीप धनखड यांनी राजस्थान बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून १९७९ साली स्वत:च्या नावाची नोंदणी केली. त्यांनी वकिलीत आपला उत्तम जम बसविला. राजस्थान उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी ते वकिली करत असत. धनखड राजस्थान उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाने धनखड यांना १९९० साली ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता दिली. सतलज नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावर २०१६ साली  जगदीप धनखड यांनी हरयाणा राज्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता.

सार्वजनिक कार्य व राजकीय कारकीर्द : १९८९ साली जगदीप धनखड यांनी राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी ते राजस्थानातील झुंझुनू मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. केंद्रात जनता दलाच्या सरकारमध्ये तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात धनखड केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री होते. १९९३ ते १९९८ या कालावधीत राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील किशनगंज विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. जगदीप धनखड हे जाट समुदायाचे नेते आहेत. उत्तर भारतातील राज्यांत जाट समुदाय हा राजकीयदृष्ट्या प्रबळ आहे. 

ममता बॅनर्जी यांच्याशी तीव्र मतभेद

२०२१ साली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपने सारे सामर्थ्य एकवटले होते. मात्र, त्यावेळी ममता बॅनर्जी विजयी झाल्या. विधानसभा निवडणुका होईपर्यंत व झाल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष सुरू होता, त्यावेळी त्यांचे व ममतांसाेबत खटके उडाले. आपण कायद्यानुसार सारे निर्णय घेत असल्याचा धनखड यांचा दावा होता. उपराष्ट्रपतिपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर जगदीप धनखड यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. 

किठाना गावात वडिलोपार्जित हवेली 

किठाना गावामध्ये धनखड कुटुंबीयांची वडिलोपार्जित हवेली आहे. तिथे जगदीप धनखड, दोन भाऊ कुलदीप, रणदीप व बहीण इंद्रा यांचा जन्म झाला होता. १९८९ साली धनखड यांनी झुंझुनू मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी याच हवेलीत झालेल्या बैठकांत त्यांनी निवडणुकीची रणनीती आखली होती. मात्र, आता या हवेलीची अवस्था फारशी चांगली नाही. तिथे खूपच पडझड झाली आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी : जगदीप धनखड यांच्या पत्नीचे नाव सुदेश आहे. धनखड यांचा १९७९ साली विवाह झाला. दाम्पत्याला एक मुलगी आहे. 

Web Title: A disciplined and renowned lawyer became the 14th Vice President; Struggling journey of Jagdeep Dhankhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.