संघर्षाची स्वप्नपूर्ती... साध्वी ऋतंभरा अन् माजी मंत्र्यांना अश्रू अनावर; राम मंदिराने आठवला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 03:27 PM2024-01-22T15:27:16+5:302024-01-22T15:30:40+5:30
अयोध्या नगरीत आज रामभक्तांचा मेळा जमला असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाच्या दर्शनासाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज विधीव्रत ...
अयोध्या नगरीत आज रामभक्तांचा मेळा जमला असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक रामललाच्या दर्शनासाठी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते आज विधीव्रत पूजा करुन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. राम मंदिर उभारणीसाठी आंदोलन करणारे, आंदोलनात सहभागी होणारे कारसेवक देशाच्या विविध राज्यातून, जिल्ह्यातून अयोध्येला पोहोचले आहेत. ज्या कुटुंबातील कारसेवकांचे निधन झाले, त्यांच्या पुढील पिढ्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राऊन हा आनंद आणि तितकाच भावनिक क्षण साजरा करत आहेत. यावेळी, अनेकांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं.
प्रभू श्रीराम यांचा गेल्या ५०० वर्षांपासूनच वनवास संपल्याचं अनेक कारसेवक म्हणतात. ५०० वर्षांपासूनची ही मंदिराची लढाई आज जिंकली. रामलला मोठ्या उत्साहात अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. राम मंदिर आंदोलनात सक्रीय असलेल्या माजी मंत्री उमा भारती याही गेल्या १० दिवसांपासून अयोध्येत आहेत. आजचा हा क्षण डोळ्यात साठवताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने या आंदोलनातील अनेकांच्या गाठीभेटी झाली. ज्या स्वप्नासाठी एकत्र लढलो, ती स्वप्नपूर्ती कित्येक वर्षांनी झाल्याचा आनंद या सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसून येत आहे. सन १९९० च्या दशात भाजपा नेत्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा यांनी सक्रीय सहभाग घेत तुरुंगवासही भोगला. उमा भारती यांनी मुंडण करुन या आंदोलनात सहभागी होत योददान दिलं होतं. आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा समोरा-समोर आल्या आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. दोघींनीही परस्परांना मिठी मारली अन् डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. राम जन्मभूमी आंदोलनातील ते सगळे क्षण, तो संघर्ष आणि तो इतिहास त्यांच्या डोळ्यासमोरुन तरळून गेला. आज हे भव्य राम मंदिर आणि दैपिप्यमान सोहळा पाहून त्यांचं मन भरुन आलं होतं.
उमा भारतीचं योगदान
मी १२ वर्षांची असल्यापासून या दिवसाची वाट पाहात होते. रामचंद्रास परमहंस यांनी मला ही जागा दाखवली होती. तेव्हा, बंद कुलूपात रामलला होते, केवळ पुजेसाठी ते कुलूप उघडले जात. हिंदू समाजाचा हा केवढा अपमान आहे, अशी भावना त्यावेळी माझ्या मनी होती. तेव्हापासूनच मी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले आहे. पहिल्यांदा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा आम्ही बांधाच्या तुरुंगात होतो. आमच्यासोबत मिश्रा, वसुंधरा आणि मेहता हेही होते. एका गेस्ट हाऊसला तुरुंगाचा दर्जा देऊन आम्हाला तेथे ठेवले होते. मात्र, मी डोक्याचं मुंडन करुन, वेश बदलून तेथून पळून गेले होते, अशी आठवण आणि रामजन्मभूमी आंदोलनातील आपला सहभाग उमा भारती यांनी यापूर्वी सांगितला होता.