एक कुटुंब, सहा महिन्यांच्या मुलाला सोडून तीन महिला झाल्या बेपत्ता, दागदागिने आणि रोकडही गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 07:40 PM2024-03-25T19:40:39+5:302024-03-25T19:57:04+5:30
Chhattisgarh Crime News: एकाच कुटुंबातील तीन महिला एका सहा महिन्यांच्या मुलाला सोडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिला आपल्यासोबत दागदागिने आणि तीन लाख रुपयांची रोख रक्कमही घेऊन गेल्या. कुटुंबातील तीन महिला अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत पडले आहेत.
छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तीन महिला एका सहा महिन्यांच्या मुलाला सोडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिला आपल्यासोबत दागदागिने आणि तीन लाख रुपयांची रोख रक्कमही घेऊन गेल्या. कुटुंबातील तीन महिला अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. नातेवाईकांनी त्यांचे फोटो प्रसिद्ध करून त्यांची माहिती देणाऱ्याला २० हजार रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. शहरातील वॉर्ड ५ मोतीसागरपाडा क्षेत्रातील ही घटना आहे. हे कुटुंब येथेच वास्तव्यास होते. दरम्यान, या कुटुंबातील तीन महिला १७ मार्च रोजी बेपत्ता झाल्या होत्या.
मात्र त्या अद्याप घरी परतलेल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीय त्रस्त आहेत. सहा महिन्यांच्या छोट्या बाळाला घेऊन या महिला गेल्याने समस्या वाढल्या आहेत. या घटनेबाबत कुटुंब प्रमुख ताराबाई सारथी यांनी सांगितले की, फरार झालेल्या महिलांनी आपल्यासोबत दागदागिने आणि रोख रक्कमही नेली आहे. मात्र त्याबाबत आमची काही तक्रार नाही. त्या जिथे कुठे असतील तिथून त्यांनी परत यावे. त्यांना याबाबत आम्ही काही बोलणार नाही.
तर कुटुंबातील अन्य एक सदस्य सरोजिनी सारथी यांनी सांगितले की, १७ मार्चपासूनच तिन्ही महिला बेपत्ता आहेत. त्यांची खूप शोधाशोध केली. मात्र आतापर्यंत त्यांची काहीच माहिती हाती लागलेली नाही. त्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जी व्यक्ती त्यांच्याबाबत माहिती देईल, त्याला २० हजार रुपये बक्षीस दिलं जाईल. दरम्यान, सहा महिन्यांच्या मुलाला घरात सोडून महिला अशा प्रकारे निघून गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या महिला घरातून जाताना रोख रक्कम आणि दागदागिने का घेऊन गेल्या असाव्यात, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. ही घटना घडल्यानंतर आठवडाभराने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच पोलिसांनीही या महिलांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.