अग्नितांडव! जयपूर दुर्घटनेत आतापर्यंत १४ मृत्यू; जळालेले मृतदेह ओळखणेही कठीण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 10:16 IST2024-12-21T10:15:38+5:302024-12-21T10:16:59+5:30

या दुर्घटनेवर सुप्रीम कोर्टाने कमिटी ऑन रोड सेफ्टी यांच्या मुख्य सचिवांकडून रिपोर्ट मागवला आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक कमिटीही बनवण्यात आली आहे. 

A fire broke out due to the collision of many vehicles one after the other. Death toll in Jaipur tanker truck collision rises to 14 | अग्नितांडव! जयपूर दुर्घटनेत आतापर्यंत १४ मृत्यू; जळालेले मृतदेह ओळखणेही कठीण...

अग्नितांडव! जयपूर दुर्घटनेत आतापर्यंत १४ मृत्यू; जळालेले मृतदेह ओळखणेही कठीण...

जयपूर - शहरातील भीषण अग्निकांडात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत यात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ३० हून अधिक लोक जखमी आहेत. २८ लोक ८० टक्क्याहून अधिक भाजले आहेत. ज्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेतील अनेक मृतदेह ओळखणेही कठीण झाले आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी सरकारने डीएनए चाचणीचा निर्णय घेतला आहे. मृतकांचे DNA नमुने पाठवले जातील. अपघातातील बस जळून राख झाली आहे. १६ महिन्यापूर्वीच या बसचा परवाना संपला असल्याचं पुढे आले आहे.

२० डिसेंबरला जयपूर अजमेर हायवेवर सकाळी ६ च्या सुमारास एलपीजी टँकर आणि ट्रक यांच्यात जोरदार टक्कर झाली. या अपघातानंतर एलपीजी टँकरचा स्फोट झाला त्यामुळे आसपासची ४० वाहने आगीच्या विळख्यात सापडली. या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात जिवंत जळालेल्या लोकांचे मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत दिसून येत आहेत. यातील जखमी ८० टक्क्याहून अधिक भाजले आहेत. या दुर्घटनेवर सुप्रीम कोर्टाने कमिटी ऑन रोड सेफ्टी यांच्या मुख्य सचिवांकडून रिपोर्ट मागवला आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक कमिटीही बनवण्यात आली आहे. 

अपघातात प्राण गमावलेल्या मृत आणि जखमींना भरपाई जाहीर करण्यात आली आहे. राजस्थान सरकार मृतांना ५ लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपयांची मदत करणार आहे. त्याचवेळी केंद्र सरकारने मृतांना २ लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे. या दुर्घटनेत ड्युटीवरून घरी परतणाऱ्या राजस्थान पोलिसातील २८ वर्षीय महिला कॉन्स्टेबल अनिता मीना यांचाही मृत्यू झाला आहे. त्याचवेळी ऑटो चालक शत्रुघ्नचा अपघातानंतर झालेल्या भीषण स्फोटामुळे चेहरा चांगलाच भाजला आहे. त्याने ऑटो सोडून तिथून पळ काढल्याने त्याचा कसा तरी जीव वाचला आहे. आग इतकी वेगाने पसरली की ४० हून अधिक गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. टँकरच्या मागे धावणारी एक स्लीपर बस आणि महामार्गाच्या बाजूला असलेली पाईप फॅक्टरीही जळाली.

शुक्रवारी सकाळी भारत पेट्रोलियमचा टँकर अजमेरहून जयपूरच्या दिशेने येत होता. ५.४४ मिनिटांनी टँकरने दिल्ली पब्लिक स्कूलसमोर यू-टर्न घेतला. यावेळी जयपूरहून अजमेरकडे जाणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. धडकेमुळे टँकरचे ५ नोझल तुटले आणि १८ टन गॅसची गळती झाली. यामुळे एवढा शक्तिशाली स्फोट झाला की संपूर्ण परिसर आगीच्या गोळ्यात बदलला. टँकरचा स्फोट झाला तेथून २०० मीटर अंतरावर एलपीजीने भरलेला दुसरा टँकर होता. सुदैवाने  त्याला आग लागली नाही अशी माहिती गेल इंडिया लिमिटेडचे अधिकारी सुशांत कुमार सिंह यांनी दिली. 
 

Web Title: A fire broke out due to the collision of many vehicles one after the other. Death toll in Jaipur tanker truck collision rises to 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग