फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 03:54 PM2024-11-01T15:54:28+5:302024-11-01T15:55:38+5:30
Uttar Pradesh Fire News: उत्तर प्रदेशमधील बांदा येथे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फटाके फोडण्याच्या स्पर्धेदरम्यान, भीषण दुर्घटना घडली आहे. स्पर्धेदरम्यान फटाक्यांतील दारूमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ७ दुकानं जळाली.
उत्तर प्रदेशमधील बांदा येथे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फटाके फोडण्याच्या स्पर्धेदरम्यान, भीषण दुर्घटना घडली आहे. स्पर्धेदरम्यान फटाक्यांतील दारूमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ७ दुकानं जळाली. त्यामुळे या कुटुंबांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तसेच अनेक तास चाललेल्या मदतकार्यानंतर आग शमवण्यात यश आले.
पीडितांनी सांगितले की, काही शेजाऱ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या फटाके फोडण्याच्या स्पर्धेमुळे आमचं मोठं नुकसान झालं आहे. सारं काही आगीत जळून गेल्याने आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून पीडितांना धीर दिला. तसेच शक्य तितक्या मदतीचं आश्वासन दिलं आहे.
ही घटना बबेरू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमासिन रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथे काल रात्री दिवाळीनिमित्त काही दुकानदार आपली दुकानं बंद करून आपल्या घरी गेले होते. तेवढ्यात त्यांना दुकानामध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. आग लागल्याची माहिती मिळताच हे दुकानदार धावतपळत घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत त्यांची दुकानं जळून खाक झाली होती. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने खूप प्रयत्नांती ही आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले.
या आगीत प्रचंड नुकसान झालेल्या दुकानदारांनी सांगितले की, दुकानांजवळच फटाके फोडण्याची स्पर्धा सुरू होती. त्यामुळे दुकानांना मागच्या बाजूने आग लागली. या आगीमध्ये ४ दुकानं पूर्णपणे जळून गेली आहेत. तक ३ दुकानांमधील थोडंफार सामान वाचलं आहे. सर्व दुकानांमधील मिळून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान डीएसपी सौरभ सिंह यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळेही लागली असण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.