रात्री झोपेत असताना आग लागली; साडी, बेडशीट बांधून सातव्या मजल्यावरून लोक खाली उतरले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 08:23 AM2023-11-12T08:23:32+5:302023-11-12T08:23:55+5:30
सातव्या मजल्यावर आग लागल्याने तेथील इतर फ्लॅटमधील अनेक लोक अडकले होते. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यामधील एका उंच इमारतींच्या सोसायटीमध्ये शनिवारीरात्री भीषण आग लागली. राष्ट्रीय महामार्ग ४४ च्या बाजुलाच असलेल्या एपेक्स ग्रीन नावाच्या सोसायटीतील सी ब्लॉकच्या ७ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही अग लागली होती. परिस्थिती एवढी बेकार झाली की, सातव्या मजल्यावरील लोकांना चादरी, बेडसीट, साड्या एकमेकांना बांधून खाली उतरावे लागले.
सातव्या मजल्यावर आग लागल्याने तेथील इतर फ्लॅटमधील अनेक लोक अडकले होते. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतू, दिवाळीनिमित्त दिवे, लाईटची तोरणे लावल्याने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीच्या घटनेत अद्याप कोणाचा मृत्यू झाल्याचे समजलेले नसले तरी अनेकजण होरपळल्याची माहिती मिळत आहे. या लोकांना नजिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने बिल्डिंगमध्ये अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू केले आहे. परंतू, सातव्या मजल्यावर अग्निशमन दलाची उपकरणे पोहोचू शकत नसल्याने रेस्क्यू करण्यास अडथळे येत होते. त्यांच्याकडे अत्याधुनिक उपकरणेही नव्हती. यामुळे नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
आग लागल्यामुळे १४ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहणारे जवळपास ५० लोक होते. हायड्रोलिक प्लॅटफॉर्म नसल्याने त्यांना रस्सी, बेडशीट आणि साड्या एकमेकांना बांधून खाली उतरावे लागले.