राम अवतरले; स्वप्न साकारले; सायंकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 07:12 AM2024-01-23T07:12:03+5:302024-01-23T07:13:06+5:30

लाखो रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. याच सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग औत्सुक्याने वाट पाहत होते.

A five hundred year dream of millions of Ram devotees has come true. | राम अवतरले; स्वप्न साकारले; सायंकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश

राम अवतरले; स्वप्न साकारले; सायंकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश

अयोध्या : रामनामाचा गजर... सनई चौघड्यांसह ५० वाद्यांचा निनादणारा मंगलध्वनी... पुरोहितांचे भारावून टाकणारे वैदिक मंत्रोच्चार अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात रामलल्लांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला... पौष शुक्ल द्वादशीला दुपारी ठीक १२ वाजून २९ मिनिटे व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे व ३२ सेकंदांपर्यंतच्या अभिजित शुभमुहूर्तावर रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. लाखो रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. याच सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग औत्सुक्याने वाट पाहत होते.

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिर परिसरात सकाळपासूनच लगबग सुरू झाली. दहा वाजल्यापासून निमंत्रित मान्यवर पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली. मुख्य सोहळ्यापूर्वी देशातील विविध राज्यांतून आलेल्या पारंपरिक वाद्यांचे वादन आणि प्रख्यात गायक शंकर महादेवन, सोनू निगम आदींच्या सादरीकरणाने मंगलध्वनी सोहळा पार पडला. त्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचे मंदिर परिसरात आगमन झाले. लाल रंगातील वस्त्रात चांदीचे छत्र घेऊन मंदिराच्या मुख्यद्वारापासून चालत जात पंतप्रधान मोदींनी गर्भगृहात प्रवेश केला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठेच्या विधींना प्रारंभ झाला. प्राणप्रतिष्ठा पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लांच्या मूर्तीला कमलपुष्प अर्पण केले. रामलल्लांच्या देखण्या मूर्तीचे दर्शन होताच  'जय श्रीराम'चा जयघोष झाला. सायंकाळी प्रज्वलित रामज्योतीने  अवघा देश उजळला.

११ दिवसांचे अनुष्ठान पूर्ण :  

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांचे अनुष्ठान ठेवले होते. सोमवारी या सोहळ्यासाठी गर्भगृहात आल्यावर मुख्य पूजेपूर्वी अकराव्या दिवसाचे विधी, पूजन व संकल्प केला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर स्वामी गोविंददेव महाराज यांच्या हस्ते चरणामृत ग्रहण करत अनुष्ठान पूर्ण केले.

शिवमंदिरात पूजा, जटायू मूर्तीचे अनावरण :

पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरातील कुबेर टिळा येथील शिव मंदिरातही पूजा केली व जटायू मूर्तीचे अनावरण केले. त्यानंतर राम मंदिराच्या निर्माण कार्यात सहभागी श्रमिकांवर पुष्पवर्षाव केला.

कशी आहे रामलल्लांची नवी मूर्ती?

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि रामलल्लांच्या देखण्या मूर्तीने सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फिटले. भाळी तिलक असलेल्या आणि दागिने व भरजरी वस्त्रांनी नटलेल्या आणि अतिशय सौम्य भावमुद्रेतील रामलल्लांच्या मूर्तीचे सौंदर्य मोहित करणारे असेच आहे.  कमळाच्या फुलावर विराजमान रामलल्लांची मूर्ती ४.२४ फूट उंच, ३ फूट रुंद व २०० किलोची आहे.  
nकृष्ण शैलीत तयार केलेली ही मूर्ती हजारो वर्षे जुन्या श्यामल शिळेतून घडविण्यात आली. 

रत्नजडित मुकुट

मूर्तीभोवती आभामंडळ असून मूर्तीवर स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्यदेव कोरलेली आहेत. देखणे आणि तितकेच विलोभनीय डोळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत, तर डाव्या हातात धनुष्यबाण आहे. मूर्तीच्या खाली एका बाजूला हनुमान आणि दुसऱ्या बाजूला गरुड कोरलेले आहेत. मूर्तीवर सुमारे पाच किलोचे रत्नजडित मुकुट असून त्यावर वेगवेगळी रत्न मढवलेली आहे. मूर्तीवरील दागिने रत्न, माणिक, मोती व हिऱ्यांपासून तयार केले आहेत.

असा पार पडला प्राणप्रतिष्ठा सोहळा

११.५५ वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हातात चांदीची छत्री आणि रामलल्लांचे वस्त्र घेऊन आगमन झाले. 
१२.१० वाजता : मुख्य आचार्यांनी प्रथम शुद्धीकरण केले. हातात पाणी घेऊन पूजन व प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. 
१२.२० वाजता : प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला सुरुवात. सुरुवातीला गणपतीची पूजा झाली. 
१२.२५ वाजता : रामलल्लांच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी मूर्तीच्या चरणी कमळाची 
फुले अर्पण केली.
१२.२९ ते १२.३१ वाजता : कमळाच्या फुलाने मूर्तीवर पाणी शिंपडून अभिषेक विधी पूर्ण केला. रामलल्लांच्या मूर्तीला विविध पूजेचे साहित्य अर्पण करण्यात आले.
१२.३५ वाजता : पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लांची आरती झाली.
१२.५५ वाजता : रामलल्लांच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालून मोदींनी साष्टांग नमस्कार घातला. नंतर ते गर्भगृहातून बाहेर पडले.

Web Title: A five hundred year dream of millions of Ram devotees has come true.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.