चौदा वर्षांच्या मुलीला कोळशाच्या भट्टीत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 08:47 AM2023-08-04T08:47:33+5:302023-08-04T08:48:11+5:30

याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

A fourteen-year-old girl was burned in a coal furnace | चौदा वर्षांच्या मुलीला कोळशाच्या भट्टीत जाळले

चौदा वर्षांच्या मुलीला कोळशाच्या भट्टीत जाळले

googlenewsNext

जितू प्रधान -

भीलवाडा : राजस्थानातील भीलवाडा येथे १४ वर्षे वयाच्या मुलीला कोळशाच्या भट्टीत जाळण्यात आल्याची भीषण घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

भीलवाडा जिल्ह्यातील कोटडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री १० वाजता ही घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलीच्या थोरल्या भावाने पोलिसांना सांगितले की, बुधवारी सकाळी ८ वाजता माझी बहीण बकऱ्यांना चरायला घेऊन गेली. दुपारी ३ वाजता बकऱ्या घरी परतल्या; पण बहीण आली नाही. त्यामुळे आम्ही तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. ही मुलगी राहत होती त्या गावाच्या बाहेर एक कोळसा भट्टी सुरू होती. त्या भट्टीजवळ अल्पवयीन मुलीच्या चपला आढळून आल्या, तसेच तिने घातलेले चांदीचे कडे व हाडांचे तुकडे सापडले. त्यामुळे या भट्टीत त्या मुलीला जाळण्यात आले असावे, असा गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली.

पोलिसांकडून तीन जणांना अटक
याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींनी त्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला भट्टीत जाळले असल्याचा पोलिसांचा कयास आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: A fourteen-year-old girl was burned in a coal furnace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.