नेदरलँड्सहून आले 'वऱ्हाड'! परदेशी तरूणी आणि भारतीय तरूणाचं लग्न; पोलिसांचीही हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:02 PM2023-11-30T13:02:13+5:302023-11-30T13:02:29+5:30
नवरदेव हार्दिक हा नेदरलँड्समधील एका औषध कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे.
प्रेमाला कोणती सीमा नसते असे नेहमी बोललं जातं. प्रेमात पडलेली मंडळी आपले प्रेम मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही... याचाच प्रत्यय देणारी घटना उत्तर प्रदेशातील फतेहरपूर येथून समोर आली आहे. खरं तर इथे एक तरुणी सातासमुद्रापार जाऊन उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात प्रियकरापर्यंत पोहोचली. बुधवारी दोघांचा कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. परदेशी तरुणी आणि स्थानिक तरुणाची ही प्रेमकहाणी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. नेदरलँड्समधून आलेल्या या तरूणीचे आणि स्थानिक हार्दिकचे प्रेमसंबंध होते. तीन वर्षांपूर्वी त्या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यानंतर दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, परदेशी तरुणी आल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलिसांनी तरुणाच्या घरी पोहोचून इतर कागदपत्रांसह तरुणीचा पासपोर्ट तपासला. हार्दिक हा नेदरलँड्समधील एका औषध कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. हार्दिकचे वडील राधेलाल वर्मा हे जवळपास चार दशकांपासून गुजरातमधील गांधीनगर शहरात राहत आहेत. तिथल्या एका खासगी कंपनीत ते नोकरीवर आहेत. त्यांना निशांत वर्मा आणि हार्दिक वर्मा (३२) अशी दोन मुले आहेत. हार्दिक ८ वर्षांपासून नेदरलँड्समधील एका फार्मास्युटिकल कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे.
नेदरलँड्सहून आले 'वऱ्हाड'
नेदरलँड्समध्ये नोकरी करत असताना तीन वर्षांपूर्वी हार्दिकची भेट त्याच कंपनीत काम करणाऱ्या ब्रिएला डुडा या २० वर्षीय तरूणीशी मैत्री झाली. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढत गेली आणि जवळपास दोन वर्षे ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. हार्दिक आणि गॅब्रिएला यांनी त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिल्यावर कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले. लग्नासाठी घरच्यांचा होकार मिळाल्यानंतर १५ दिवसांपूर्वी हार्दिक आणि त्याची परदेशी मैत्रीण गॅब्रिएला भारतात आले. यानंतर हार्दिक त्याच्या होणाऱ्या पत्नीला गांधीनगर येथील त्याच्या घरी घेऊन गेला होता. हार्दिकच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत तिथे साखरपुडा पार पडला.
घरच्यांच्या संमतीने लागले लग्न
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, परदेशी तरुणी आणि तरुणाच्या लग्नाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि दोघांचे पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली. दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्न केले.