भोंगळ कारभार! ना एसी ना फ्रीज तरीही ९० वर्षीय आजीबाईंना आलं १ लाखांचं 'वीज बिल'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 05:45 PM2023-06-22T17:45:00+5:302023-06-22T17:45:30+5:30
उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या गिरिजम्मांना हे पाहून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले.
कोप्पल : कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील भाग्यनगर येथे ऊर्जा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. इथे छोट्या शेडमध्ये राहणाऱ्या गिरिजम्मा या ९० वर्षीय आजीबाईंना १ लाख रुपयांचे वीजबिल आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खरं तर दरमहा ७० ते ८० रूपये येणारा वीजबील अचानक लाखोंच्या घरात पोहोचल्याने प्रशानसावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या गिरिजम्मा यांना हे पाहून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले.
दरम्यान, माध्यमांनी ऊर्जामंत्र्यांना प्रश्न विचारल्यानंतर के.जे जॉर्ज यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित आजीबाईंना वीजबिल मिळाले आहे, ज्यामध्ये मीटरमधील त्रुटीमुळे चुकीच्या रकमेचा उल्लेख आहे. पण त्यांना बिल भरण्याची गरज नाही. मंत्र्यांच्या विधानानंतर स्थानिक गुलबर्गा वीज पुरवठा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित शेडकडे धाव घेतली.
प्रशासनाचा भोंगळ कारभार
कार्यकारी अभियंता राजेश यांनी वीज मीटरची पाहणी करून तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. कर्मचारी व बिल वसूल करणाऱ्यांच्या चुकीमुळे बिल वाढीव आल्याचे निदर्शनास आले. मग त्यांनी एवढे बिल भरण्याची गरज नसल्याचे सांगितले. पण या भोंगळ कारभारावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली. दरम्यान, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. पण वीज दरवाढीच्या निषेधार्थ औद्योगिक संघटनांनी बंदची हाक दिली आहे.