आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:23 AM2024-11-27T11:23:08+5:302024-11-27T11:23:52+5:30
पप्पू यादवला त्यांच्या एका जवळच्या मित्राने बुलेटप्रूफ लँड क्रूझर कार भेट दिली आहे. ही कार अगदी रॉकेट लाँचर हल्लेही सहन करण्यास सक्षम असल्याचं सांगण्यात येत आहे.
बिहारच्या पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स बिश्नोई यांच्या गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पप्पू यादव यांच्या जवळच्या मित्राने त्यांना सुरक्षेसाठी बुलेट प्रूफ लँड क्रूजर कार गिफ्ट केली आहे. त्यामुळे यापुढे आता नवीन लँड क्रूजरमधून पप्पू यादव प्रवास करणार आहेत.
जेव्हा पप्पू यादव या नव्या कारमध्ये फिरत होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भलेही सरकार माझ्या सुरक्षेवर लक्ष देत असलं तरी माझे मित्र, बिहार आणि देश माझ्या सुरक्षेसाठी उभे आहेत. माझ्या मित्राने ही कार परदेशातून पाठवली आहे, जी १५ दिवसांनी आज मिळाली. ही माझ्यासाठी गिफ्ट म्हणून त्याने दिली. या कारवर ना ग्रेनेट हल्ल्याचा परिणाम होऊ शकतो ना रॉकेट लॉन्चर उडवू शकतो. जोपर्यंत मी या कारमध्ये सुरक्षित आहे असं त्यांनी सांगितले.
बाबा सिद्दीकी हत्येनंतर मिळाली धमकी
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सातत्याने खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. पूर्णिया येथील त्यांचे निवासस्थान अर्जुन भवन उडवून टाकू असं त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे पप्पू यादव यांच्या सुरक्षेत सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत २० हून अधिक वेळा त्यांना धमकीचे कॉल आले आहेत. त्यानंतर त्यांच्या घरची सुरक्षा व्यवस्थेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एका धमकीच्या कॉलमध्ये त्यांना ५ कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आली आहे.
किती सुरक्षित आहे नवीन बुलेटप्रूफ लँड क्रूजर?
बुलेटप्रूफ लँड क्रूजर सुरक्षेच्या दृष्टीने खूप विश्वसनीय कार मानली जाते. बुलेटप्रूफ बॅलेस्टिक ग्लासमुळे कारवर ५०० गोळ्यांचे राऊंडही झेलण्याची क्षमता आहे. बॅलेस्टिक लेयरमुळे कारच्या आत आणि बाहेरील बाजूस स्फोटामुळे काही नुकसान होऊ शकत नाही. त्याशिवाय या लँड क्रूजरचे टायरही विशेषरित्या बनवले गेले आहेत ज्यावर बुलेटचा परिणाम होत नाही. टोयोटाची लँड क्रूजर एक फुल साइज एसयूवी आहे. ज्यात तुम्हाला ४४६१ सीसी इंजिन मिळते.