प्रत्येकाच्या खिशात खुळखुळेल पैसा, भारतीयांची स्वप्नपूर्ती करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प -पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 05:42 IST2025-02-02T05:42:01+5:302025-02-02T05:42:48+5:30
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आहे.

प्रत्येकाच्या खिशात खुळखुळेल पैसा, भारतीयांची स्वप्नपूर्ती करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प -पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली: यंदाचा अर्थसंकल्प हा ऐतिहासिक आणि भारतीयांच्या स्वप्नपूर्तीसह 'विकसित भारत' अभियानाला बळ देणारा असल्याची प्रशंसा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केली. यातून विकास, गुंतवणूक आणि क्रयशक्ती अनेक पटीने वाढेल, प्रत्येकाच्या खिशात पैसा खुळखुळेल, असे ते म्हणाले.
आज भारत 'विकास आणि वारसा' या मंत्रावर वाटचाल करीत असल्याचे सांगून यासाठी अर्थसंकल्पात ठोस पावले उचलली असल्याचे मोदी यांनी नमूद केले. १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा हा अर्थसंकल्प असल्याचे मोदी म्हणाले. पांडुलिपींच्या एक कोटी हस्तलिखित संवर्धनासाठी 'ज्ञान भारत मिशन'च्या तरतुदीचा मोदी यांनी खास उल्लेख केला. आण्विक ऊर्जा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात दिलेले प्रोत्साहन ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आपला आठवा अर्थसंकल्प सादर केला.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आहे.
'वही-खाता' पद्धतीच्या पिशवीत अर्थसंकल्पाचा टॅबलेट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६चा अर्थसंकल्प टॅबलेटच्या माध्यमातून सादर केला. हा टॅबलेट त्यांनी पारंपरिक 'वही-खाता' शैलीच्या लाल पिशवीत ठेवला होता.
अर्थसंकल्पाची कागदपत्रे सुटकेसमधून घेऊन येण्याचे सीतारामन यांनी २०१९च्या जुलैपासून बंद केले. कोरोना काळात त्यांनी टॅबलेटचा वापर करून अर्थसंकल्पीय भाषण केले होते.
मात्र, शनिवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना भेटायला जाण्याआधी सीतारामन यांनी अर्थसंकल्प असलेली ब्रिफकेस हातात घेतलेली छायाचित्रे प्रसारमाध्यमांनी टिपली. दरवर्षी अर्थसंकल्प सादर होण्याआधीची ही एक परंपरा आहे.
राष्ट्रपतींनी दिली दहीसाखर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर
करण्यापूर्वी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपती मुर्मु यांनी सीतारामन यांचे दहीसाखर देऊन स्वागत केले. मुर्भु यांनी त्यांना अर्थसंकल्प सादर करण्याच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.
गुरजादा अप्पाराव यांचे स्मरण
गुरजादा अप्पाराव या प्रसिद्ध तेलुगू लेखकाच्या 'देशामंते मत्ती काडोयी, देशामंते मनुधुलोयी' (देश म्हणजे फक्त जमीन नाही, तर तेथे राहणारे लोक आहेत) या प्रसिद्ध वाक्याचा निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख केला.
विरोधकांचा सभात्याग
लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर निवेदनाची मागणी करत सुमारे पाच मिनिटे घोषणा दिल्या व त्यानंतर सभात्याग केला. त्यानंतर काही मिनिटांनी हे खासदार पुन्हा सभागृहात आले.
मोदींनी केले भाषणाचे कौतुक
अर्थसंकल्प मांडल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी निर्मला सीतारामन यांच्या भाषणाचे भरभरून कौतुक केले. त्यावेळी सीतारामन यांनीही त्यांना नमस्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.