धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:33 AM2024-09-25T10:33:43+5:302024-09-25T10:34:08+5:30
UPSC ची तयारी करणारी ही महिला शकरपूर येथे भाड्याच्या घरात एकटीच राहते.
दिल्लीतील शकरपूर येथून संतापजनक तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला भाडेकरूच्या बाथरूम आणि बेडरूममध्ये लपवलेल्या कॅमऱ्यांचा वापर करून तिचा अश्लील व्हिडीओ बनवल्याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. खरे तर नागरी सेवा परीक्षेची (UPSC) तयारी करणारी ही महिला शकरपूर येथे भाड्याच्या घरात एकटीच राहते. व्हिडीओ पोस्ट करणारा आरोपी करण हा घरमालकाचा मुलगा असून त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो. महिलेने सांगितले की, जेव्हा ती उत्तर प्रदेशातील तिच्या घरी गेली होती, तेव्हा तिने फ्लॅटच्या चाव्या त्याच्याकडे सोपवल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिला अलीकडेच तिच्या व्हॉट्सॲप अकाउंटवर काही वेगळी ॲक्टिव्हिटी दिसली आणि तिने तिच्या व्हॉट्सॲप अकाउंटशी लिंक केलेली इतर उपकरणे तपासली असता तिला एक अनोळखी लॅपटॉप सापडला. त्यानंतर तिने लगेचच व्हॉट्सॲप लॉग आउट केले. यानंतर महिला सावध झाली आणि आपली हेरगिरी केली जात असल्याचा संशय आल्याने तिने तिच्या अपार्टमेंटची झडती सुरू केली. मग तिला तिच्या बाथरूमच्या बल्ब होल्डरमध्ये कॅमेरा लावलेला दिसला आणि तिने लगेच पोलिसांना याची माहिती दिली.
आरोपी करणला अटक
पोलीस संबंधित पीडितेच्या घरी पोहोचले असता त्यांना बेडरुमच्या बल्ब होल्डरमध्ये देखील दुसरा कॅमेरा सापडला. तिच्या खोलीत आणखी कोणी येत असे का, असे विचारले असता महिलेने पोलिसांना सांगितले की, ती कुठेतरी गेली की अनेकदा घरमालकाचा मुलगा करणकडे चाव्या देऊन जात असे. चौकशीदरम्यान करणने पोलिसांना सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी ती महिला तिच्या घरी गेली होती, तेव्हा तिने खोलीच्या चाव्या त्याच्याकडे ठेवल्या होत्या. दरम्यान, करणने तीन स्पाय कॅमेरे विकत घेतले आणि एक महिलेच्या बेडरूममध्ये आणि एक तिच्या बाथरूममध्ये बसवला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हे कॅमेरे ऑनलाइन वापरता येत नाहीत... मेमरी कार्डवर फुटेज साठवले जाते. त्यामुळे रेकॉर्ड केलेला व्हिडीओ लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी करणने वीज दुरुस्त करण्याच्या बहाण्याने वारंवार महिलेकडे तिच्या खोलीची चावी मागितली. आरोपी करण (३०) हा दिव्यांग असून तो आता कायदेशीर प्रक्रियेतून जात आहे. पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.