अरे बापरे! आयकर विभागाने मजुराला पाठवली ८.६४ कोटींची वसुलीची नोटीस, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 04:09 PM2023-03-21T16:09:30+5:302023-03-21T16:10:05+5:30
आयकर विभाग जर आपण कर चुकविला तर लगेच नोटीस पाठवत असते.
आयकर विभाग जर आपण कर चुकविला तर लगेच नोटीस पाठवत असते. कर चुकविणे आपल्या देशात गुन्हा आहे, अशी अनेक प्रकरणे आपण पाहिली असतील. सध्या उत्तर प्रदेशमधून एक भन्नाट प्रकरण समोर आले आहे. एका मजुराला आयकर विभागाने ८ कोटी ६४ लाख रुपयांची रिकव्हरी नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर त्या मजुराला धक्का बसला आहे, यानंतर या मजुराने बुलंद शहराचे एसएसपी यांच्याकडे तक्रार दिली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हे प्रकरण बुलंदशहर जिल्ह्यातील गुलावठी पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. बराल गावाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बराळ येथील रहिवासी असलेल्या अंकुर कुमारने १० वीपर्यंत शिक्षण घेतले असून तो मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. अंकुर याला ८ कोटींची नोटीस आल्याचे समजताच त्याला धक्का बसला. अंकुर यांनी स्थानिक लोकांशी याबाबत चर्चा केली, मात्र कोणीही या समस्येवर तोडगा काढू शकला नाही. त्यानंतर अंकुर कुमार सोमवारी एसएसपी कार्यालयात पोहोचले आणि अर्ज देऊन न्यायाची मागणी केली.
अंकुर यांनी एसएसपी यांना निवेदन दिले. 'मी २०१७ मध्ये १०वीची परीक्षा उत्तीर्ण झालो. पण, नोकरी न मिळाल्याने मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागलो.२०१९ मध्ये गावातील एका तरुणाने मला त्याच्या मेव्हण्याला भेटायला लावले. त्याच्या मेव्हण्याने मला नोकरी लावून देण्याच्या नावाखाली दुसऱ्या तरुणाशी ओळख करून दिली आणि त्याच्याकडे प्रमाणपत्रासह शैक्षणिक कागदपत्रे देण्यास सांगितली, असं त्यांनी निवेजनात म्हटले आहे. आरोपीने त्याच्याकडून शैक्षणिक कागदपत्रे व इतर प्रमाणपत्रे घेतल्याचा आरोप आहे.
यादरम्यान, त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर स्वाक्षरीही करण्यात आली. दोन दिवसांनी त्यांची कागदपत्रे त्यांना परत करण्यात आली. पण, त्याला नोकरी मिळू शकली नाही. सध्या ते गावात मजूर म्हणून काम करतात. मात्र आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांच्या कागदपत्रांवरुन बँक खाते उघडण्यात आले आणि त्यातून ८.६४ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कोणतेही बँक खाते उघडले नाही किंवा कोणताही व्यवसाय केलेला नाही, असं या निवेदनात म्हटले आहे.
सध्या पीडित व्यक्तीने बुलंदशहरचे एसएसपी श्लोक कुमार यांना तक्रार पत्र देऊन या प्रकरणी न्यायाची मागणी केली आहे. दुसरीकडे, प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसएसपी बुलंदशहर श्लोक कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सीओ सिकंदराबाद विकास प्रताप चौहान यांच्याकडे सोपवला आहे. तपास सोपवत एसएसपींनी तपासानंतर दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.