गणपतीला अर्पण केलेला लाडू १ कोटी ८७ लाखांना विकला; दरवर्षी होतो लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 12:37 PM2024-09-18T12:37:01+5:302024-09-18T12:37:56+5:30
दरवर्षी हैदराबादमधील एक संस्था गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या लाडूंचा लिलाव करते. यावेळी त्यांचा लिलाव झालेला ५ किलोचा लाडू दीड कोटींहून अधिक रुपयांना विकला आहे.
गणेशोत्सव देशभरात धुमधडाक्यात झाला. गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दानपेटीत दान केले जाते. काही ठिकाणी सोन, चांदीही दान केले जाते. हैदराबादमधील एका मंडळाला लाडू अर्पण केला, पण या लाडूची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. लिलावात या लाडूला मोठ्या प्रमाणात किंमत मिळाली आहे. हा लाडू शंभर किंवा हजार रुपयांचा नसून करोडो रुपयांना विकला. हैद्राबादच्या बंदलागुडा येथील किर्ती रिचमंड व्हिला येथे गणेश उत्सवादरम्यान दिले जाणारे लाडू लिलावासाठी ठेवण्यात आले होते.
Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?
सोमवारी रात्री उशिरा झालेल्या लाडूच्या लिलावात तो अंदाजे १.८७ कोटींना विकला. गेल्या वर्षीच्या किमतीपेक्षा ही किंमत ६१ लाख रुपयांनी अधिक आहे. गेल्या वर्षी या लाडूचा लिलाव १.२६ कोटी रुपयांना झाला होता. करोडोंना विकल्या जाणाऱ्या या लाडूचे वजन पाच किलो आहे.
कीर्ती रिचमंड व्हिलाच्या लाडूची जोरदार चर्चा असते. सर्वात महागडा लाडू असा विक्रम केला आहे. २०१९ मध्ये लिलाव सुरू झाला यामध्ये लाडूची किंमत १८.७५ लाख रुपये होती. यानंतर, २०२० मध्ये २७.३ लाख, २०२१ मध्ये ४१ लाख, २०२२ मध्ये ६० लाख आणि २०२३ मध्ये १.२६ कोटी रुपयांची बोली लावण्यात आल्या.
व्यवस्थापकीय विश्वस्त अभय देशपांडे यांनी सांगितले की, लोकांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. विविध धार्मिक पार्श्वभूमीतील १०० हून अधिक व्हिला मालकांनी लिलावात भाग घेतला, यात ४०० हून अधिक बोली लागल्या. दरवर्षी गणपती उत्सवादरम्यान आयोजित केलेला हा अनोखा चॅरिटी लिलाव गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
या क्राउडफंडिंग प्रयत्नामुळे ४२ पेक्षा जास्त एनजीओ, वंचित शाळकरी मुले आणि गरजूंना फायदा होतो. आर.व्ही. दिया चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व काम स्वयंसेवकांद्वारे शून्य प्रशासकीय खर्चासह केले जाते, असंही अभय देशपांडे म्हणाले.