कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 06:29 AM2022-07-09T06:29:02+5:302022-07-09T06:29:39+5:30
कालावधी कमी केल्याने लाभार्थी वाढले; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती
कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात आला असून, कोरोना प्रतिबंधक लसीमुळे गंभीर आजार व मृत्यूचे प्रमाण कमालीचे खालावले आहे. त्यामुळे केंद्र तसेच राज्य शासन कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत आग्रही आहे. दरम्यान, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने पसरत असल्याचे अभ्यासातून समोर आले होते. यावर लसीचा बूस्टर डोस अत्यंत प्रभावी असल्याचे सांगत तज्ज्ञांकडून कोरोना प्रतिबंधक लसीची तिसरा डोस देण्याची मागणी होत होती. त्यानंतर केंद्र शासनाकडून बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, केंद्राने बूस्टर डोस घेण्याचा कालावधी कमी केल्याने आता राज्यातील लाभार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात आता पाच कोटींहून अधिक लाभार्थी बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
बूस्टर डोस घेण्यासाठी सुरुवातीला दुसरा आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर नऊ महिन्यांचे होते. पण आता दुसरा डोस आणि बूस्टर डोस मधील अंतर नऊ महिन्यांवरून सहा महिने इतके कमी करण्यात आले आहे. म्हणजेच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आता नऊ ऐवजी सहा महिन्यांनी हा बूस्टर डोस घेता येणार आहे. त्यामुळे तिसऱ्या डोससाठी नऊ महिने लांबलचक प्रतीक्षेचा कालावधी आता थोडी कमी झाली आहे. आतापर्यंत राज्यात ३९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना बूस्टर डोस देण्यात आला आहे, अशीही माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
लससाठा तपासावा लागेल
बूस्टर डोस विषयी राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या निर्णयानंतर राज्यातील लाभार्थ्यांची संख्या वाढल्याने लससाठ्याची उपलब्धता पुन्हा तपासावी लागणार आहे. सध्या राज्यात ९० लस मात्रा उपलब्ध आहेत. अधिकच्या लससाठ्यासाठी आरोग्य विभाग केंद्र सरकारशी समन्वय साधत आहे, अशी माहिती डॉ. देसाई यांनी दिली.
बूस्टर डोस म्हणजे?
कोरोनावर कोणतेही थेट औषध सध्या उपलब्ध नाही. तथापि,ओमायक्रॉन या नव्या प्रकारासाठी तिसरा डोस घेण्याची सूचना आरोग्यतज्ज्ञांनी केली होती. त्यानुसार केंद्र शासनाने जानेवारी २०२२ पासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. याच डोसला बूस्टर डोस म्हणतात. हा ओमायक्रॉनच्या विरोधात प्रभावी असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.