वकिलाला कुत्रा चावला अन् कोर्ट झाले सावध... सरन्यायाधीश म्हणाले, लक्ष घालतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:51 AM2023-09-12T11:51:22+5:302023-09-12T11:53:04+5:30
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात त्यांच्या हाताला जखम झाली होती. ही माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कळताच त्यांनी स्वत:हून संबंधित वकिलाची विचारपूस केली.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यात त्यांच्या हाताला जखम झाली होती. ही माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कळताच त्यांनी स्वत:हून संबंधित वकिलाची विचारपूस केली. यावेळी ते म्हणाले की, भटक्या कुत्र्यांच्या धोक्यासंदर्भात ते लक्ष देतील.
कायद्याच्या गुंतागुंतीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ओळखले जाणारे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकील कुणाल चॅटर्जी यांच्या हातावर असलेली पट्टी पाहिल्यावर त्यांनी याचे कारण विचारले. चॅटर्जी म्हणाले की, त्यांच्या शेजारच्या पाच भटक्या कुत्र्यांनी त्याला ‘पळवले’, ५ कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले.
यावर, ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांनी न्यायालयाला विनंती केली की, देशातील ‘भटक्या कुत्र्यांच्या समस्येची’ स्वतःहून दखल घ्यावी. यावेळी काय करता येईल का ते आम्ही पाहू, असे चंद्रचूड यांनी चॅटर्जीकडे लक्ष वेधून हंसरिया यांना म्हटले. चंद्रचूड यांनी तत्काळ चॅटर्जी यांना तुम्हाला काही वैद्यकीय मदतीची गरज आहे का? मी लगेच तुम्हाला अधिकाऱ्यांना घेऊन जाण्यास सांगतो. दोन वर्षांपूर्वी, माझा एक कर्मचारी कार पार्क
करत होता. त्यावेळी त्याच्यावरही रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, असे चंद्रचूड यांनी सांगितले.
वडिलांच्या मांडीवरच मुलाचा मृत्यू : सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उत्तर प्रदेशातील मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या व्हिडीओचा संदर्भ देत म्हटले की, या घटनेत एका मुलाचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्याला रेबीज झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात वडिलांच्या मांडीवरच मुलाचा तडफडून मृत्यू झाला. हा गंभीर धोका आहे. लोक याकडे फारसे लक्ष देत नाहीत, असे त्यांनी सांगितले.