"धोका देणाऱ्या ललिताशी कुणी लग्न करू नका...", प्रेयसीनं फसवलं अन् प्रियकरानं संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 07:35 PM2023-03-22T19:35:25+5:302023-03-22T19:35:49+5:30
उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर इथे प्रेयसी आणि प्रियकर विवाहबंधनात अडकले होते. मात्र, मुलीच्या नातेवाईकांनी दबाव आणण्यास सुरुवात केल्याने महिनाभरातच मुलगी बदलू लागली. हे सहन न झाल्याने प्रियकराने गळफास घेऊन जीवन संपवले. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी या तरुणाने एक व्हिडीओ बनवला जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मृत तरूणाचे नाव खरवेश असून तो अलीगढचा रहिवासी आहे. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी त्याने पत्नी ललिता आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय या मुलीशी कोणीही लग्न करू नये, असे खरवेशने म्हटले आहे. तसेच आज या मुलीमुळेच मी आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले आहे.
दरम्यान, अलीगढ जिल्ह्यातील गोंडा पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील रहिवासी असलेल्या खरवेशने शेजारील गावातील रहिवासी हरवीर सिंग यांची मुलगी ललिता चौधरी हिच्यासोबत 23 फेब्रुवारी 2023 रोजी गाझियाबादमध्ये कोर्ट मॅरेज केले होते. प्रेयसी पत्नी झाल्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला. ललिता तिच्या नातेवाईकांच्या सांगण्याप्रमाणे वागायची म्हणून यांच्यात सतत भांडण व्हायचे. मुलीचे वडील हरवीर सिंग सतत मुलाला तुरुंगात पाठवण्याची धमकी देत होते, असा आरोप मृत खरवेजने व्हिडीओतून केला आहे.
मित्राच्या घरी संपवलं जीवन
मृत खरवेशच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, मुलीच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे खरवेश 18 मार्च रोजी कृष्णा नगर चौकी परिसरातील मधुबन हॉटेलच्या मागे असलेल्या द्वारकाधीश अपार्टमेंटमध्ये मित्र हिमांशूच्या घरी आला होता. दरम्यान, हिमांशू काही कामानिमित्त घरातून बाहेर गेला आणि यादरम्यान खरवेशने आधी व्हिडीओ बनवला आणि नंतर गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"