छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना, अचानक खाण कोसळल्याने अनेक गावकरी अडकले, पाच जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 03:02 PM2022-12-02T15:02:27+5:302022-12-02T15:04:20+5:30
छत्तीसगडमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे.
नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. जगदलपूरपासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगाव गावात अचानक खान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12 हून अधिक गावकरी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अजून बरेच लोक अडकले आहेत. अडकलेल्या गावकऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले आहे. तर आतापर्यंत दोन गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी अद्याप आणखी काही गावकरी अडकले असल्याचे सांगितले जात आहे. 7 पैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 5 जण खाणीत अडकण्याची शक्यता आहे. 30 ते 40 मिनिटांत अडकलेल्या सर्व गावकऱ्यांना बाहेर काढले जाईल अशी माहिती आहे.
मिझोराममध्येही खाण कोसळून 12 जणांचा झाला होता मृत्यू
14 नोव्हेंबर रोजी मिझोरामच्या हंथियाल जिल्ह्यात देखील खान कोसळून दुर्घटना घडली होती. खोदकाम सुरू असताना अनेक मोठे दगड वरून तुटून खाली पडले होते, त्यात 12 मजुरांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला होता. आसाम रायफल्स, बीएसएफ, स्थानिक पोलीस, एनडीआरएफ यांच्या पथकांनी बचाव कार्य केले मात्र या अपघातात अडकलेल्या सर्व मजुरांचा मृत्यू झाला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"