भारतभर एआयच्या मदतीने होऊ शकतो मोठा सायबर हल्ला; गोपनीय माहिती बाधित करण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 08:44 AM2023-10-11T08:44:13+5:302023-10-11T08:45:35+5:30
एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
नवी दिल्ली : आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचे फायदे जगाला होत आहे, तेवढेच आव्हाने आणि धोकेही वाढले आहेत. एआयचा गैरवापर करून सायबर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून, भारतासह आशिया-प्रशांत क्षेत्रातील देश प्रामुख्याने हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल डिफेन्स अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
कोणते क्षेत्र रडारवर?
- जगातील एकूण डीडीओएस हल्ल्यांमध्ये भारत हा पाचव्या क्रमांकावर आहे. यामध्ये यूजर्सला विविध वेबसाइट्स आणि ऑनलाइन सेवांपर्यंत पोहोचविण्यास अडथळे निर्माण केले जातात.
- विशेषतः शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, परिवहन विभागातील सेवांवर हल्ले करणे हे सोपे असते.
चॅटजीपीटीचा वापर
सायबर हल्लेखोर चॅटजीपीटीच्या माध्यमातून विशिष्ट पद्धतीने एखादा मेल लिहून तो टार्गेट असलेल्या व्यक्तीला पाठवतात. त्यालाही अनेकजण बळी पडतात.
२००% वाढ
जगात सप्टेंबर २०२२ नंतर मानव-संचालित रॅन्समवेअर हल्ल्याचे प्रमाण २०० टक्क्याने वाढले. एखाद्या ठरावीक व्यक्तीऐवजी संपूर्ण कार्यालय, विभाग वा संस्थेला लक्ष्य करण्यासाठी रॅन्समवेअर हल्ले केले जातात. ओळख लपविण्यासाठी हल्लेखोर रिमोट-एन्क्रिप्शनसह क्लाउट तंत्रज्ञानाचाही वापर करतात.