Video: मोठी दुर्घटना टळली... ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 12:33 PM2024-02-25T12:33:07+5:302024-02-25T12:43:15+5:30
चहा पिण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरलेल्या चालकानेच ही ट्रेन आपोआप सुटल्याचे पाहिले अन् त्यांच्या भुवयाच उंचावल्या
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ रेल्वे स्थानकावर थांबलेली एक मालगाडी अचानक पठाणकोटच्यादिशेने रवाना झाली. मोठा उतार असल्याने ट्रेन आपोआपच ड्रायव्हरशिवाय सुरू झाली. तब्बल ८४ किमीपर्यंत ही ट्रेन ड्रायव्हरविना धावल्याची माहिती आहे. या घटनेने रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. पंजाबच्या मुकेरिया येथे उंच मार्गावर ही ट्रेन थांबवण्यात रेल्वे प्रशासनाल यश आलं. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून तपास सुरू असल्याचं जम्मूचे डिव्हीजनल ट्रॅफिक मॅनेजरने दिली आहे.
जम्मूतील कठुआ येथे रविवारी सकाळी ७.१० वाजता ही घटना घडली असून मालगाडी क्रमांक १४८०६ R सोबत हा प्रकार घडला. येथील स्टेशनवर ट्रेनचा ड्रायव्हर गाडीतून उतरुन चहा पिण्यासाठी खाली आले होते. याचवेळी रुळावर उतार असल्याने गाडीने अचानक वेग धरला आमि ड्रायव्हर विना ही ट्रेन धावत सुटली. या मालगाडीतून काँक्रीट नेण्यात येत होत, जे कठुआ स्टेशनवरुनच भरण्यात आलं होतं. जेव्हा ट्रेनचा चालक आणि सहचालक चहा पिण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरले तेव्हा गाडीचे इंजिन सुरूच होते. याचदरम्यान, सकाळी ७.१० वाजता अचानक रेल्वे धावत सुटली. ट्रेनमधून उतरण्यापूर्वी चालकाने हँडब्रेक लावला नव्हता, अशी सुत्रांची माहिती आहे.
VIDEO | A freight train was stopped in Hoshiarpur, Punjab by placing wood blocks on railway tracks after it started moving without the driver.
— Press Trust of India (@PTI_News) February 25, 2024
As per available information, the train was coming from Kathua. After starting the train, the driver went somewhere but forgot to put a… pic.twitter.com/8LNUG1wWbD
चहा पिण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरलेल्या चालकानेच ही ट्रेन आपोआप सुटल्याचे पाहिले अन् त्यांच्या भुवयाच उंचावल्या. त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाकडून ही ट्रेन थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दसूहा येथील उंचीवरील रेल्वे मार्गावर ही ट्रेन थांबवण्यात रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. मात्र, तोपर्यंत या ट्रेनने ८४ किमीचे अंतर पार केल होते. सुदैवाने या प्रवासादरम्यान, रेल्वे ट्रॅकवर इतर कुठलीही ट्रेन नव्हती. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला. तसेच, कुठलेही नुकसान झाले नाही. मात्र, या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले असून फिरोजपूर येथून एक पथक चौकशीसाठी रवाना झाले आहे.