डीप फेकद्वारे ८ मुलींचे नग्न व्हिडिओ बनवणाऱ्या नराधमाला अटक; आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 06:45 PM2023-11-25T18:45:34+5:302023-11-25T18:46:27+5:30
सध्या डीप फेकचा गैरवापर सुरू असून यामाध्यमातून सेलिब्रेटींना लक्ष्य केले जात आहे.
रांची: सध्या डीप फेकचा गैरवापर सुरू असून यामाध्यमातून सेलिब्रेटींना लक्ष्य केले जात आहे. अशातच डीप फेकद्वारे अल्पवयीन मुलींचे नग्न व्हिडीओ बनवणाऱ्या नराधमाच्या मुसक्या रांचीपोलिसांनी आवळल्या आहेत. विद्यार्थिनींचे नग्न व्हिडीओ बनवून संबंधित आरोपी इन्स्टाग्रामवर व्हायरल करायचा. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या नराधमाचे नाव विवेक शाह असे आहे. आरोपी विवेकने रांचीच्या आठ मुलींचे फोटो गोळा केले आणि त्यांचे खोटे व्हिडीओ बनवले.
या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पथक सक्रिय झाले आणि आरोपी विवेकचे लोकेशन शोधून त्याला अटक करण्यात आली. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकुमार मेहता यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री करायचा आणि नंतर त्यांचे फोटो डीपफेक व्हिडीओंमध्ये बदलायचा. तरूणाच्या या कृत्याचा बळी ठरलेल्या काही मुलींनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.
दरम्यान, सर्व मुली अल्पवयीन असल्याचे उघड झाले. नग्न व्हिडीओ बनवण्यासाठी आमच्या फोटोंचा गैरवापर केला जात असून तो सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याची तक्रार मुलींनी केली. रांची पोलिसांनी मुजफ्फरपूर येथून अटक केलेल्या तरुणाची तुरूंगात रवानगी करण्यात आली. चौकशीत त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. या कृत्यात त्याचा आणखी कोण साथीदार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
विवेक मोठा गुन्हेगार - पोलीस
विवेक हा मोठा गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विवेकने सर्वप्रथम सोशल मीडियावर स्वत:ची प्रोफाइल तयार केली आणि स्वतः पैसेवाला असल्याचे भासवले. अनेक मुलींना फसवल्यानंतर त्याने रांचीतील एका मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिला जाळ्यात अडकवून तिच्याकडून नग्न फोटो मिळवले. यानंतर तो तिला ब्लॅकमेल करू लागला आणि तिच्या मैत्रिणींचे फोटो मागू लागला आणि त्यानंतर तो डीपफेक फोटोंच्या माध्यमातून न्यूड व्हिडीओमध्ये टाकून सोशल मीडियावर व्हायरल करायचा.