सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 05:45 AM2024-05-10T05:45:14+5:302024-05-10T05:45:54+5:30
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बहुसंख्याकांची लोकसंख्येत घसरण होत अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही त्यात नमूद केले आहे.
दिल्ली : देशात १९५० ते २०१५ दरम्यान बहुसंख्याक लोकसंख्येचा कमी झालेला वाटा आणि अल्पसंख्याकांचे वाढलेले प्रमाण हे देशातील सामाजिक विविधतेला प्रोत्साहन देण्यास अनुकूल आहे. समाजातील वंचित घटकांसाठी योग्य वातावरण आणि सामाजिक पाठबळ प्रदान केल्याशिवाय त्यांच्या चांगल्या जीवनशैलीला प्रोत्साहन देणे शक्य नाही, असा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) नुकत्याच जारी केलेल्या अहवालात काढला आहे.
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बहुसंख्याकांची लोकसंख्येत घसरण होत अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही त्यात नमूद केले आहे. 'ईएसी-पीएम'ने जारी केलेल्या 'धार्मिक अल्पसंख्याकांचा वाटा : देशव्यापी विश्लेषण'या अहवालात देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदूचा वाटा १९५० ते २०१५ या कालावधीत ७.८२ टक्क्यांनी घटला, तर मुस्लिमांचा वाटा ४३.१५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यातून देशात विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे त्यात म्हटले आहे. परिषदेने याबाबत परिपूर्ण आकडेवारी मात्र दिलेली नाही. देशातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती आणि २०२१ मध्ये होणारी जनगणना झालेली नाही.
मुस्लिमबहुल देशांत लोकसंख्येत वाढ
जगातील बहुतांश मुस्लिमबहुल देशांमध्ये बहुसंख्य धर्मीयांच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. मालदीवमध्ये बहुसंख्य गटाचा (शफी सुन्नी) वाटा १.४७ टक्क्यांनी घसरला आहे.
भारतीय उपखंडात बांगलादेशात वाढ
बांगलादेशमध्ये बहुसंख्याक धार्मिक गटाचा वाटा १८ टक्क्यांनी वाढला आहे, ही भारतीय उपखंडातील सर्वांत मोठी वाढ आहे. १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती होऊनही, पाकिस्तानातील बहुसंख्य धार्मिक पंथाचा (हनाफी मुस्लिम) वाटा ३.७५ टक्क्यांनी वाढला. एकूण मुस्लिम लोकसंख्येचा त्यांचा वाटा १० टक्क्यांनी वाढला आहे.
१६७ देशांच्या लोकसंख्येचा अभ्यास या अहवालात
जगभरातील २६७ देशांचे विश्लेषण केले आहे. जगभरात बहुसंख्याकांच्या लोकसंख्येत घसरण होत आहे. भारतातही त्यांची लोकसंख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे. दक्षिण आशियातील शेजारच्या देशांशी तुलना केल्यास त्यातील तफावत लक्षात येते. त्या देशांत बहुसंख्याकांचे प्रमाण वाढले. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण कमी होणे नवे नाही, कारण तेथील लोक तणावाच्या काळात भारतात येतात, असेही अहवालात म्हटले आहे.