कुदरत का करिश्मा! ३० वर्षापूर्वी पाण्यात बुडालेली मशीद अचानक बाहेर आली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 05:12 PM2022-09-05T17:12:04+5:302022-09-05T17:12:37+5:30
ही मशीद १२० वर्ष जुनी असून गेल्या ३० वर्षापासून पाण्यात पूर्णत: बुडाली होती.
नवादा - बिहारच्या नवादा येथे ३ दशकापूर्वी पाण्यात बुडलेली एक मशीद सापडली आहे. ३० वर्ष पाण्यात असूनही मशिदीला काहीही नुकसान झाले नाही. नवादाच्या रजौली मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावर फुलवारिया धरण आहे. या धरणाशेजारील चंदौली गावात असणारी मस्जिद ३ दशकापूर्वी पाण्यात बुडाली होती. परंतु आता पाणी पूर्ण आटल्यानं ३० वर्षांनी पहिल्यांच मशीद दिसू लागली. त्यामुळे मशीद पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली.
पाण्यातून मशीद बाहेर आली अशी चर्चा आसपासच्या गावांमध्ये पसरली. त्यामुळे जिल्ह्यातील विविध परिसरातील मुस्लीम लोक कुटुंबासह याठिकाणी मशीद पाहण्यासाठी पोहचले. मागील काही दिवसांपासून ही मशीद चर्चेत आली आहे. काही युवकांनी हातात चप्पल घेत चिखलातून मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र चिखल आणि पाणी असल्याने मशिदीच्या जवळ जाता आले नाही.
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, ही मशीद १२० वर्ष जुनी असून गेल्या ३० वर्षापासून पाण्यात पूर्णत: बुडाली होती. मात्र तरीही इतक्या वर्षांनी पाणी ओसरल्यानंतर मशिदी जैसे थे आहे. मशिदीचं कुठल्याही प्रकारे नुकसान झाले नाही. फुलवारिया धरणाचं बांधकाम १९८४ मध्ये करण्यात आले होते. त्याकाळी या जागेवर मोठ्या संख्येने मुस्लीम समुदायाची वस्ती होती. जमीन अधिग्रहण केल्यानंतर धरणाची निर्मिती करण्यात आली. तेव्हा येथील स्थानिकांना दुसरीकडे स्थलांतरित करत हरदिया डॅमच्या शेजारील गावात वसवण्यात आले. धरणाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मशिदीला तसेच सोडण्यात आले. पाणी भरल्यानंतर मशीद पूर्णपणे पाण्यात गेली. केवळ मशिदीचा घुमट पाण्याबाहेर दिसून येत होता. मात्र आता पाण्याची पातळी एकदम कमी झाल्यामुळे मशीद लोकांना दिसत आहे.