राम मंदिरामध्ये स्थापन होणार नवी मूर्ती, मग रामललांच्या जुन्या मूर्तीचं काय करणार? ट्रस्टने दिली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:52 AM2023-12-28T10:52:27+5:302023-12-28T10:52:44+5:30
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरामध्ये नव्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर सध्या अयोध्येत पूजा होत असलेल्या रामललांच्या छोट्या मूर्तीचं काय करण्यात येणार, याबाबत भक्तांमध्ये कुतूहल आहे.
अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेसाठी रामललांच्या दोन मूर्ती घडवण्यात येत आहेत. त्यामधील एक मंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यात येणार आहे. मात्र नव्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर सध्या अयोध्येत पूजा होत असलेल्या रामललांच्या छोट्या मूर्तीचं काय करण्यात येणार, याबाबत भक्तांमध्ये कुतूहल आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या छोट्या मंदिरात असलेली रामललांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहामध्येच नव्या मूर्तीसह प्राणप्रतिष्ठापित करण्याचा विचार सुरू आहे. नव्या मूर्तीला अचल मूर्ती संबोधले जाईल. तर जुन्या मूर्तीला उत्सवमूर्ती म्हणून ओळखलं जाईल.
ही उत्सवमूर्ती देशातील वेगवेगळ्या सिद्ध मंदिरांमध्ये नेण्यात येईल. त्यानंतर ती राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये अचल मूर्तीच्या बाजूला स्थापित कऱण्यात येईल. रामललांची नवी मूर्ती घडवण्याचं काम गणेश भट्ट, अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे या मूर्तीकारांकडे सोपवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०० जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० डिसेंबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या धाम रेल्वे स्टेशन आणि श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्धाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते येथे एका सभेला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील विमानतळापासून रेल्वेस्टेशनपर्यंत रोड शो काढतील, असंही सांगण्यात येत आहे.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी वैदिक अनुष्ठान हे मुख्य समारंभापूर्वी एक आठवडा आधी सुरू होणार आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य अनुष्ठान गणेश्वर शास्त्री द्रविड आणि लक्ष्मीकांत दीक्षित यांच्याकडून करण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला भाविकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.