कौतुकास्पद! स्वत:चे IAS होण्याचे स्वप्न भंगले; आता गरीबांच्या स्वप्नांना पंख देतोय 'खाकीतला शिक्षक'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 04:32 PM2022-12-25T16:32:59+5:302022-12-25T16:33:36+5:30
पोलिसांचे नाव ऐकताच लहानग्यांच्या मनात भीती निर्माण होत असते.
गोंडा : पोलिसांचे नाव ऐकताच लहानग्यांच्या मनात भीती निर्माण होत असते. मात्र, उत्तर प्रदेशमधील एका पोलीस जवानाने ही प्रतिमा बदलण्यास सुरुवात केली आहे. इथे लहान मुले चक्क पोलिसाकडून शिक्षणाचे धडे घेत आहेत. खरं तर 'खाकीतील शिक्षक' गरीब मुलांमध्ये चांगल्या शिक्षणाचा प्रकाश जागवत आहे. कर्तव्यासोबतच गोंडा जिल्ह्यातील एक पोलीस हवालदार समाजातील प्रतिमा सुधारण्याचे काम करत आहे. हवालदार मो. जाफर असे या पोलीस शिक्षकाचे नाव आहे. ते ड्युटी संपल्यानंतर गरीब मुलांना रोज एक तास मोफत शिकवतात. स्थानिक पोलीस चौकीच्या शेजारी असलेल्या जाफर चाचारी इथे ते झाडाखाली शाळा चालवतात. येथे ते कोणत्याही मुलाकडून फी घेत नाहीत.
पोलीस शिक्षकामुळे गरिबांच्या शिक्षणाला चालना
दरम्यान, पोलीस सरांच्या या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतची मुले शिकण्यासाठी येतात. इथे मुलांना एका तासात गणित, विज्ञानासह जवळपास सर्वच विषयांचा अभ्यास शिकवला जातो. या शाळेत नवोदय शाळेत प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेली मुलेही सहभाही होतात. या शाळेत रोज येणारे करण आणि शिवानी कश्यप सातवीच्या वर्गातले असून त्यांनी सांगितले की, पोलीस सर खूप छान शिकवतात. ते त्यांना खूप मदत करतात. त्यांच्याकडे खासगी शिकवणी लावण्यासाठी पैसे नव्हते. पण मो. जाफर सरांच्या क्लासची खूप मदत झाली. या दोन मुलांचे वडील रणवीर सिंग यांनी म्हटले, "पोलीस शिक्षक मुलांना रोज मोफत शिकवतात. हा एक अद्भुत उपक्रम आहे."
'खाकीतला शिक्षक'
हवालदार मो. जाफर सांगतात की, ड्युटी संपल्यानंतर ते कुठेही फिरायला जात नाहीत. त्याऐवजी ते दररोज गरीब मुलांना शिक्षण देतात. विज्ञान शाखेतून पदवीधर असलेल्या मो. जाफर यांचे नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न होते. पण ते पूर्ण होऊ शकले नाही. मो. जाफर यांनी आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, आता त्यांची इच्छा आहे की मी शिकवलेल्या या मुलांपैकी एक जरी यशस्वी झाला तर त्यांची इच्छा पूर्ण होईल. गोंडा जिल्ह्यातील कर्नेलगंज पोलीस स्टेशन हद्दीतील चाचरी पोलीस चौकीच्या शेजारी पोलीस शिक्षकाची ही शाळा दररोज दुपारी 4 वाजता भरते असे त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"