पंतप्रधानांनी पत्नीशिवाय बंगल्यात राहू नये; लालूंचा मोदींवर निशाणा, अजित पवारही लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 03:20 PM2023-07-06T15:20:50+5:302023-07-06T15:21:50+5:30
दिल्ली विमानतळावर पत्रकारांनी लालू प्रसाद यादव यांना घेरले होते. त्यावेळी, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना लालू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली
नवी दिल्ली - भाजपविरुद्ध देशातील विरोधी पक्षांची एकजुट बांधण्यासाठी प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी पाटण्यात पहिली बैठक घेतली होती. त्यानंतर, दुसरी बैठक बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडल्यानंतर आता शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली असून भाजपाविरुद्ध आपली लढाई सुरूच राहिल, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी, प्रमुख विरोधी पक्षांसोबत त्यांची बोलणीही सुरू असून ते आज दिल्लीत आहेत. आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव हेही दिल्लीत पोहोचले. यावेळी, माध्यमांनी प्रश्न विचारताच त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
दिल्ली विमानतळावर पत्रकारांनी लालू प्रसाद यादव यांना घेरले होते. त्यावेळी, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना लालू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. विरोधी पक्षातील पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न लालू प्रसाद यादव यांना विचारण्यात आला होता. त्यासोबतच, राहुल गांधींना लग्न करण्याचा दिलेला सल्ला, यावरुनही पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर निशाणा साधला.
#WATCH | When asked about the PM face from Opposition & his earlier advice to Rahul Gandhi to get married, RJD chief Lalu Prasad Yadav says, "Whoever becomes the PM should not be without a wife. Staying at PM residence without a wife is wrong. This should be done away with..,"… pic.twitter.com/uh0dnzyoJk
— ANI (@ANI) July 6, 2023
जो कोणी पंतप्रधान बनतो, त्याने पत्नीशिवाय पंतप्रधान निवासस्थानी राहायला नाही पाहिजे. पत्नीशिवाय पंतप्रधान निवासस्थानी राहणं चुकीचं आहे, ही पद्धत संपवली पाहिजे, असे लालू यादव यांनी म्हटले. नरेंद्र मोदी भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहेत, तुम्ही पाहिलं महाराष्ट्रात मोदींनी कशाप्रकारे भष्ट्राचाऱ्यांना मंत्री बनवलंय, असे म्हणत राष्ट्रवादीला सोबत घेतल्याच्या मुद्द्यावरुनही त्यांनी मोदींना फटकारलं. दरम्यान, भाजपाविरुद्ध देशातील विरोधी पक्षांच्या आघाडीला ३०० पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा जिंकता येतील, असे भाकीतही त्यांनी केले. दरम्यान, आपल्या रुटीन चेकअपकसाठी ते आज दिल्लीला आले होते.