राम मंदिरावर तयार होत आहे प्रचारगीत; २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांना घेरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 08:01 AM2023-12-31T08:01:53+5:302023-12-31T08:02:43+5:30
या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना घेरण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे.
नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील राम मंदिरास सर्वांत मोठा निवडणूक मुद्दा बनविण्याची जोरदार तयारी भाजपने केली आहे. या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना घेरण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार साहित्यात भाजपचा सर्व भर राममंदिरावरच राहणार आहे. राम मंदिराचे पोस्टर्स होर्डिंग्ज तयार केले जात आहेत. निवडणूक गीते आणि भजनांतही राममंदिरच मुख्य असेल. सर्व रणनीती या पद्धतीने आखली जात आहे की, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना घेरता येऊ शकेल. या मुद्द्यावर विरोधी पक्षांची ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था झाली आहे. दि. २२ जानेवारीच्या उद्घाटन सोहळ्यास जावे की नको, असा पेच विरोधी पक्षांसमोर निर्माण झाला आहे.
निरहुआ व मनोज तिवारी यांच्या आवाजात राममंदिरावरील गाणी व भजने भाजपकडून आणली जात आहेत. पंतप्रधान मोदी यांची हॅट्ट्रिक व ४०० जागा जिंकण्याचा मनसुबा त्यात आहे. मुख्य पोस्टर व होर्डिंग्जवर मंदिराच्या स्थापनेच्या वेळी मोदी यांनी घातलेल्या साष्टांग दंडवताचा फोटो असेल.
१ जानेवारीपासून घरोघर अक्षतांचे वाटप
- राममंदिराचा मुद्दा लोकांच्या मनात ठसविण्यासाठी दि. १ जानेवारीपासून भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते घरोघर जाऊन अयोध्येला येण्यासाठी अक्षता आणि निमंत्रण देतील.
- देशातील प्रत्येक मंदिरात अक्षतांचे पूजन करून वाटप केले जाईल.
- कोट्यवधी कार्यकर्ते त्यात सहभागी होतील.