कुस्ती महासंघाच्या निलंबनावर कुस्तीपटू विनेश फोगट खूश, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 04:56 PM2023-12-24T16:56:18+5:302023-12-24T16:59:18+5:30
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये या बातमीने आनंदाचे वातावरण आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी एक मोठा निर्णय जाहीर केला. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज भारतीय कुस्ती महासंघावर नव्याने निवडून आलेल्या संजय सिंह आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. नवनिर्वाचित मंडळ माजी अध्यक्ष (ब्रिजभूषण शरण सिंह) चालवत असल्याचे सरकारने म्हटले आहे. कुस्ती महासंघाला पुढील आदेश येईपर्यंत त्यांचे सर्व उपक्रम स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याबरोबरच केंद्रीय मंत्रालयाने नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केले आहे. क्रीडा मंत्रालयाचा हा निर्णय कुस्ती महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. कारण, संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे अत्यंत खास म्हणून ओळखले जातात.
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये या बातमीने आनंदाचे वातावरण आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून कुस्ती महासंघाला राजकारणापासून दूर ठेवावे, असे म्हटले आहे. तसेच, आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी महिलेला बसवायला हवे. कारण, महिलांच्या समस्या फक्त एक महिलाच समजू शकते. महिला अध्यक्ष निवडून आल्यास महिला खेळाडूंचे भले होईल. आता निलंबनामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे, असे विनेश फोगट हिने म्हटले आहे.
दुसरीकडे, महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमच्या बहिणी आणि मुलींसाठी लढलो. आमची लढाई सरकारसोबत नव्हती. ही लढत फक्त खेळाडूंसाठी होती. आता सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. महिला कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष एका महिलेला बनवायला हवे, असे मतही साक्षी मलिकेने व्यक्त केले आहे. तसेच क्रीडा मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय भल्यासाठी असल्याचं साक्षी मलिक म्हणाली.