विमानात मद्य देण्याच्या धोरणाचा फेरविचार; महिलेवर लघुशंका करणाऱ्याला काेठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 06:47 AM2023-01-08T06:47:40+5:302023-01-08T06:47:59+5:30
गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी विमानात त्याने दारूच्या नशेत ज्येष्ठ सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती.
नवी दिल्ली : न्यूयाॅर्कहून भारताकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या आरोपीस दिल्ली पोलिसांनी ४२ दिवसांनंतर बंगळुरू येथे शनिवारी अटक केली. मात्र, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत न पाठवता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
या घटनेमुळे विमानात दिल्या जाणाऱ्या मद्याबाबत धोरणाचा एअऱ इंडियाने फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत. व्यवस्थापनाने संबंधित विमानाच्या ४ कर्मचाऱ्यांना कामापासून दूर केले आहे. शंकर मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी विमानात त्याने दारूच्या नशेत ज्येष्ठ सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. महिलेने एअर इंडियाकडे तक्रार केली होती. आरोपी शंकर मिश्रा याला पोलिसांनी बंगळुरू येथे अटक केली.
बहिणीच्या घरी बसला होता लपून
दिल्लीचे पोलिस उपायुक्त (विमानतळ) रविकुमार सिंग यांनी सांगितले की, आरोपी बंगळुरूमधील बहिणीच्या घरी लपून बसला होता. त्याने आपले सर्व फोन बंद केले होते. तो जागा बदलत होता. त्याच्या फोन हिस्ट्रीच्या माध्यमातून त्याचे ठिकाण शोधले. शुक्रवारी तो म्हैसूरमध्ये होता. तो टॅक्सीने प्रवास करीत असताना पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले पण, तो निसटला.
२ तास ठेवले पीडित महिलेला ताटकळत
पीडित महिलेचे एक सहप्रवासी असलेले डॉ. सुगत भट्टाचारजी यांनी एअर इंडियाला दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले की, आरोपीने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्यानंतर हवाई सुंदरींनी तिला स्वच्छ होण्यास मदत केली. आसन बदलून मागितले. ४ आसने उपलब्ध असतानाही तिला २ तास ताटकळत ठेवले. २ तासांनी तिला दुसरे आसन देण्यात आले.
ब्लॅकमेलिंगचा संशय
शंकरचे वडील श्याम मिश्रा यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुलाविरोधातील आरोप खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलेला आम्ही नुकसानभरपाई दिली आहे, तरीही तक्रार करण्यात आली. ब्लॅकमेल करण्यासाठी तिने असे केले असू शकते, असा आरोप श्याम मिश्रा यांनी केला आहे.