पंजाबमधील तरनतारन येथे पोलीस ठाण्यावर रॉकेट लॉन्चरने हल्ला, हल्लेखोर फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 09:23 AM2022-12-10T09:23:43+5:302022-12-10T09:24:22+5:30
Rocket Launcher Attack On Police Station: पंजाबमध्ये पुन्हा एकदा पोलीस ठाण्यावर रॉकेट लॉन्चरने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तरनतारन जिल्ह्यातील सरहालीजवळ असलेल्या सांझ केंद्रामध्ये शुक्रवारी रात्री रॉकेट लॉन्चरच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला.
चंडीगड - पंजाबमध्ये पुन्हा एकदा पोलीस ठाण्यावर रॉकेट लॉन्चरने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तरनतारन जिल्ह्यातील सरहालीजवळ असलेल्या सांझ केंद्रामध्ये शुक्रवारी रात्री रॉकेट लॉन्चरच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इमारतीचे किरकोळ नुकसान झाले असून, इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. हल्लेखोराची ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
शुक्रवारी रात्री सुमारे १ च्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्लात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात पंजाबपोलिसांच्या स्टेट इंटेलिजन्स हेडक्वार्टर मोहालीमध्येही अशाच प्रकारे रॉकेट लॉन्चर हल्ला झाला होता. त्यानंतर तो दहशतवादी हल्ला असल्याचे निष्पन्न झाले होते.
सरकालीमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रॉकेट लॉन्चरमधून सोडलेले रॉकेट पोलीस ठाण्याच्या लोखंडी गेटवर आदळले आणि सांझ केंद्राच्या इमारतीजवळ जाऊन पडले. त्यामुळे इमारतीच्या काचा आणि खिडक्यांचे नुकसान झाले. हा हल्ला झाला तेव्हा एसएचओ प्रकाश सिंह यांच्यासोबत ड्युटी अधिकारी आणि ८ पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
यावर्षी जुलै महिन्यात याच मार्गावर एका दहशतवाद्याला आयईडीसह पकडण्यात आले होते. अधिकाऱ्यांच्या मते पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयकडून पंजाबमधील वातावरण बिघडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे.