सापासोबत 'खेळ' करणं साधूला पडलं महागात; तडफडत झाला मृत्यू अन् लोक काढत राहिले VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:58 PM2023-01-11T16:58:41+5:302023-01-11T16:59:37+5:30
उत्तर प्रदेशातील जालौनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील जालौनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साप पकडताना त्याच्याशी खेळ करणे एका साधूच्या चांगलच आंगलट आले. सापासोबत खेळ करत असताना सापाने साधूला चावा घेतला आणि तो बेशुद्ध झाला. मात्र, उपस्थित लोक साधूला मदत करायची सोडून व्हिडीओ काढत राहिले. संबंधित साधूची गंभीर स्थिती पाहून त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. साधूच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
खरं तर ही घटना कुथुंड पोलीस स्टेशन हद्दीतील नीम गावातील आहे. नीम गावात श्रीमद भागवत कथेच्या समारोपप्रसंगी भंडारा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी प्रसाद घेण्यासाठी हजेरी लावली होती. दरम्यान, कार्यक्रमास्थळी अचानक एक विषारी साप आला. हे पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि सर्वजण इतरत्र पळू लागले. याची माहिती मिळताच नवर गावातील रहिवासी साधू सीताराम हे प्रसाद घेण्यासाठी आले असता त्यांनी साप पाहिला. पण तेवढ्यात साप झुडपात लपला. त्यावर साधूने त्याला काठीने पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. साधूने काठीने सापाला पकडण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र, साप त्यांना पकडता आला नाही. यादरम्यान साधूने काठीने सापाला दाबले. अशातच सापाने साधूचा चावा घेतला, त्यामुळे ते जागीच खाली कोसळले.
लोक व्हिडीओ काढत राहिले
यादरम्यान साप पकडताना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी घाईघाईने घटनास्थळ गाठले आणि व्हिडीओ काढू लागले. मात्र, साधूला तात्काळ रुग्णालयात नेण्याऐवजी लोक त्यांचा व्हिडीओ काढत राहिले. साधू बराच वेळ जमिनीवर तडफडलेल्या अवस्थेत होते. त्यानंतर इतर काही ग्रामस्थ तिथे आल्यानंतर साधूला प्राथमिक आरोग्य केंद्र कुथुंड येथे दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"