30 चा पंच...! 'चलाख' चीनला 'सणसणीत' उत्तर, शपथ घेताच मोदी सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 03:33 PM2024-06-12T15:33:58+5:302024-06-12T15:34:42+5:30
...या निर्णयामुळे चीनला मिर्ची लागणार असल्याचे मानले जात आहे. एवढेच नाही, तर भारत सरकारच्या या निर्णयाकडे, चीनला दिलेले जशास तसे उत्तर म्हणूनही बघितले जात आहे.
देशात एनडीए सरकार स्थापन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. असाच एक निर्णय तिबेटसंदर्भात घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे चीनला मिर्ची लागणार असल्याचे मानले जात आहे. एवढेच नाही, तर भारत सरकारच्या या निर्णयाकडे, चीनला दिलेले जशास तसे उत्तर म्हणूनही बघितले जात आहे. द डिप्लोमॅटने दिलेल्या एका वृत्तानुसार, भारत सरकारने तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे बदलण्याची तयारी सुरू केली आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बलण्याचा खोडसाळपणा केला, त्याला हे प्रत्युत्तर मानले जात आहे.
संबंधित वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या एनडीए सरकारने तिबेटमधील या ठिकाणांची नावे बदलण्यासही मंजुरीही दिली आहे. नावे निवडण्यासाठी सखोल संशोधन केले गेले आहे, एवढेच नाही तर या नावांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. तसेच ती तिबेटशी संबंधितही आहेत. भारतीय लष्कर लवकरच ही नावे जाहीर करणार असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील नकाशांमध्येही त्यांचा समावेश केला जाणार आहे.
भारत सरकारने ज्या ठिकाणांच्या नावांना मंजुरी दिली त्यांत, निवासी क्षेत्र, पर्वत, नद्या, तलाव आणि पर्वतीय खिंडींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. द डिप्लोमॅटने माजी इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी बेनू घोष यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, PM मोदींना आपल्या मजबूत छबीच्या जोरावर ही निवडणूक जिंकायची होती. यामुळे ते आपली छबी काय ठेवण्यासाठी तेबेटमधील ठिकाणांची नावे बदलण्यास परवानगी देतील. तसेच, हे भारताकडून पुन्हा एकदा तिबेटसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.