रस्त्याने जाणाऱ्या सात वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; संपूर्ण शरीरावर जखमा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 08:09 PM2023-12-14T20:09:32+5:302023-12-14T20:10:09+5:30
यापूर्वी एका पाच वर्षीय मुलावर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
लुधियाना: पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढलाय. आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, रस्त्यावरून फिरणेही कठीण झाले आहे. अशातच बडेवाल रोडच्या सुनील पार्क परिसरात चार भटक्या कुत्र्यांनी सात वर्षीय मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. कुत्र्यांनी मुलीवर हल्ला करुन तिला फरफटत नेले.
मुलीचा आवाज ऐकून परिसरातील लोक धावले आणि तिचा जीव वाचवला. पण, या हल्ल्यात कुत्र्यांनी मुलीला अनेक ठिकाणी चावले आणि ओरबाडले, त्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यात कुत्रे मुलीला ओरबाडत असल्याचे दिसत आहे.
सराभा नगर पोलिस स्टेशनचे एसएचओ अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांनी व्हिडिओ पाहिला आहे, पण याबाबत सध्या कोणीही तक्रार दिलेली नाही. तक्रार आल्यास परिसरात निश्चितपणे तपासणी केली जाईल.
10 कुत्र्यांनी मुलाचा पाठलाग केला
लुधियानामध्ये कुत्र्यांच्या दहशतीच्या घटना दररोज समोर येत आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्यात एका पाच वर्षीय मुलावर 10 कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. मुलगा रुग्णालयात दाखल असलेल्या त्याच्या कुटुंबीयांसाठी डब्बा घेऊन घेत होता. वाटेत सुमारे 10 कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याच्यावर हल्ला केला. मुलाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि कुत्र्यांच्या तावडीतून मुलाला वाचवले.